
हिंदुस्थानी फलंदाजांनी अॅडलेड कसोटीत अक्षरशः लोटांगण घातले. पॅट कमिन्स व जोश हेझलवूडच्या भेदक माऱयासमोर हिंदुस्थानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. टीम इंडियाचा दुसरा डाव 36 धावांमध्येच गडगडला. हिंदुस्थानचा कसोटी क्रिकेटमधील हा नीचांक ठरला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठीचे 90 धावांचे आव्हान दोन गडी गमावत पूर्ण केले आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
हिंदुस्थानचा संघ दुसऱया दिवसअखेरीस 62 धावांनी पुढे होता. मात्र कसोटीच्या तिसऱया दिवशी बॅकफूटवर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने झोकात पुनरागमन करीत टीम इंडियाला डोकंही वर काढू दिले नाही. पॅट कमिन्स व जोश हेझलवूड या जोडगोळीने हिंदुस्थानच्या दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 21.2 षटकांत हिंदुस्थानचा दुसरा डाव 36 धावांमध्ये आटोपला.
जोश हेझलवूडने 8 धावांमध्ये पाच, तर पॅट कमिन्सने 21 धावांमध्ये चार फलंदाज बाद केले. 90 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने जो बर्न्स (नाबाद 51 धावा), मॅथ्यू वेड (33 धावा) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आठ गडी राखून ओलांडले. पहिल्या दोन दिवसांत पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने अडीच दिवसांत सामना जिंकला हे विशेष. हिंदुस्थानला मात्र डे नाईट कसोटीमध्ये पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला.
65 वर्षांनंतर…
हिंदुस्थानला दुसऱया डावात फक्त 36 धावाच करता आल्या. गेल्या 65 वर्षांमध्ये एका डावात सर्वात कमी धावसंख्या नोंदवली गेलेली ही पहिलीच खेप. याआधी 1955 साली इंग्लंडने ऑकलंडमध्ये न्यूझीलंडला 26 धावांमध्ये गुंडाळले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरलीय.
सर्व फलंदाजांची एकेरी धावसंख्या, दुसऱयांदाच घडले
हिंदुस्थानला दुसऱया डावात फक्त 36 धावाच करता आल्या. या डावाचे वैशिष्टय़ म्हणजे, एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. टीम इंडियाचे अकराही फलंदाज एकेरी धावसंख्येवरच राहिले. मयांक अग्रवाल याने सर्वाधिक 9 धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या 143 वर्षांच्या इतिहासात दुसऱयांदाच असे घडले. 1924 सालात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला 30 धावांमध्ये गुंडाळले होते. त्या डावात 11 धावा अवांतर होत्या, पण एकाही फलंदाजाला दुहेरी धावा करता आल्या नव्हत्या.




























































