IND vs ENG 3rd Test – लॉर्ड्सवर हवा जसप्रीत बुमराचीच, अर्धा संघ धाडला तंबूत; अशी कामगिरी करणारा हिंदुस्थानचा पहिलाच गोलंदाज

फोटो - BCCI

क्रिकेटच्या पंढरीत जसप्रीत बुमराने आपल्या धारधार गोलंदाजीने इंग्लंडच्या अर्ध्या संघाला तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराने पुन्हा एकदा सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत पाच विकेट घेतल्या. त्यामुळे जसप्रीत बुमरा आता परदेशात सर्वाधिकवेळा पाच विकेट घेणारा हिंदुस्थानचा गोलंदाज ठरला आहे.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये लॉर्ड्सवर तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी विकेट घेण्यात अयशस्वी ठरलेल्या बुमराने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपला जलवा दाखवून दिला. त्याने पहिली विकेट शतकवीर जो रूटची घेतली आणि इंग्लंडला मोठा हादरा दिला. त्यानंतर हेरी ब्रुक (11), कर्णधार बेन स्टोक्स (44), क्रिस वोक्स (0) आणि जोफ्रा आर्चर (4) यांना तंबूत धाडलं. जसप्रीतला नितीश कुमार रेड्डी (2 विकेट), सिराज (2 विकेट) आणि जडेजा (1 विकेट) यांची साथ मिळाली. परंतु दुसऱ्या कसोटीत चमकादर कामगिरी करणारा आकाश दीपला एकही विकेट मिळवता आली नाही.

IND Vs ENG 3rd Test – Joe Root ची लॉर्ड्सवर ऐतिहासिक खेळी, राहुल द्रविडचा विक्रम मोडला

जसप्रीत बुमराने या सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने टीम इंडियाचे दिग्गज माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडित काढला आहे. जसप्रीत बुमरा आता परदेशात सर्वाधिक 13 वेळा पाच विकेट घेणारा हिंदुस्थानचा प्रथम गोलंदाज ठरला आहे. हा विक्रम यापूर्वी कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये परदेशात सर्वाधिक 12 वेळा पाच विकेट घेतल्या आहेत.