
लॉर्ड्सवर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने शतकं ठोकलं आहे. लीड्स आणि बर्मिंघहमध्ये शांत राहिलेली जो रूटची बॅट ऐतिहासिक लॉर्ड्सवर तळपली. जो रुटचे हे कसोटी कारकिर्दीमधील 37 वे शतकं ठरलं आहे. त्याने या बाबतीत आता राहुल द्रविड आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकलं आहे.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेले जॅक क्रॉली (18) आणि बेन डकेट (23) झटपट बाद झाले. त्यामुळे अनुभवी फलंदाज म्हणून जो रूटवर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी होती. त्याने ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडत संयमी फलंदाजी केली. आणि पहिल्या दिवशी 99 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जो रुट शतक ठोकणार का, यावर सर्वांच्या नजरा स्थिरावल्या होत्या. जो रुटने दुसऱ्या दिवसाची अगदी थाटात सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर चौक मारत त्याने आपलं 37 व शतक साजरं केलं. यासबोत जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा चौथा खेळाडू ठरला आहे.
या क्रमवारीत जो रूटच्या पुढे पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर (51 शतके), जॅक कॅलीस (45 शतके), रिकी पॉण्टिंग (41 शतके) आणि कुमार संगकारा (38 शतके) यांचा समावेश आहे. त्याने राहुल द्रविड आणि स्टीव्ह स्मिथ (36 शतके) या दोघांनाही मागे टाकलं आहे. त्याचबरोबर सध्याच्या घडीला सर्वाधिक शतकांची नोंद सुद्धा जो रुटच्या नावावर आहे. तसेच हिंदुस्थाविरुद्ध त्याचे हे 11 वे शतक ठरले असून त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची याबाबतीत बरोबर केली आहे.