IND vs ENG 3rd Test – ड्यूक्सचा गोलमाल! 18 षटकांमध्ये दोनवेळा चेंडू बदलला, स्टुअर्ट ब्रॉडही संतापला

फोटो - PTI

लॉर्ड्सवर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ड्यूक्स चेंडूंमुळे गोलंदाजांना त्रास सहन करावा लागला होता. आता तिसऱ्या कसोटीमध्येही चेंडूंची डोकेदुखी सुरुच आहे. दुसऱ्या दिवशी 18 षटकांमध्ये दोनवेळा चेंडू खराब झाला. त्यामुळे चेंडूंच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. यापूर्वी कर्णधार शुभमन गिल, सिराज आणि टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी चेंडूच्या गुणवत्तेवर नाराजी व्यक्त केली आहे. अशातच इंग्लंडचा माजी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे.

स्टुअर्ट ब्रॉडने ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, “क्रिकेटमध्ये चेंडू हा एक उत्तम यष्टीरक्षकासारखा असला पाहिजे. आपण चेंडूबद्दल बोलत आहोत कारण तो खरेखरच चिंतेचा विषय बनला आहे. पाच वर्ष झाले तरी ड्यूक्स चेंडूमध्ये एक समस्या आहे आणि ती दुरुस्त करणे आवश्यक आहे. चेंडू 10 नाही तर 80 षटके टिकला पाहिजे.” असं म्हणत त्याने ड्यूक्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. तसेच त्याच्यामध्ये बदल करणं देखील गरजेच असल्याच तो म्हणाला आहे.