
ओल्ड ट्रॅफर्डवरही बॅझबॉलला म्यान केल्यामुळे क्रिकेटप्रेमींना कसोटी शैलीतला ‘ओल्ड इज गोल्ड’ खेळ पाहायला मिळाला. हिंदुस्थानच्या यशस्वी जैसवाल, के.एल. राहुल आणि साईसुदर्शनने सावध खेळ केला असला तरी दमछाक झाली. दिवसभरात 350 धावांचा टप्पा गाठणाऱया या मालिकेत आज हिंदुस्थानने 4 विकेट गमावत फक्त 266 धावाच काढल्या. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रवींद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर 19 धावांवर खेळत होते.
वन डे आणि टी-20 क्रिकेटने चिंब भिजलेल्या नव्या दमाच्या खेळाडूंना कसोटी क्रिकेट काय आहे, याची कल्पना नसावी अशी प्रतिक्रिया गेले काही दिवस इंग्लिश चाहते देत होते. कसोटी क्रिकेटला रोमहर्षक करताना त्याच्या आत्म्यावर हल्ला केला जात असल्याची टीकाही केली जात होती. त्यामुळे लॉर्ड्सवर दोन्ही संघांनी बॅझबॉलला म्यान केल्याचे दिसले होते आणि आता मँचेस्टरमध्येही तेच दिसतेय. मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असलेल्या हिंदुस्थानने प्रारंभापासून घेतलेला सावध पवित्रा दिवसभर कायम राखला.
जैसवाल-राहुलची कसोटीपूर्ण सुरुवात
यशस्वी जैसवालने आज आपला कसोटीवाला खेळ दाखवताना राहुलसह तब्बल 30 षटके किल्ला लढवत 94 धावांची सलामी दिली. गेल्या कसोटीत जैसवालला काही करता आले नव्हते. मात्र या कसोटीत त्याने 107 चेंडूंत 58 धावा केल्या. ही जोडी व्होक्सने फोडली. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा धावफलकावर 78 धावा लागल्या होत्या. मात्र दुसऱया सत्रात सलामीची जोडीही फुटली आणि कर्णधार शुभमन गिलही बाद झाला. दुसरे सत्र हिंदुस्थानला चांगलेच महागात पडले. हिंदुस्थानचे फॉर्मात असलेले जैसवाल, राहुल आणि गिल हे तिघेही 46 धावांत बाद झाले.
पंतने डावाला केले वेगवान
चहापानापूर्वी हिंदुस्थानने आपले तीन मोहरे गमावले. संघाचे वातावरण चिंतीत झाले. पण त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने सारा माहौलच बदलून टाकला. इंग्लिश माऱ्यापुढे जिथे हिंदुस्थानची आक्रमकता सावध झाली होती, तिथे पंतने आपली फटकेबाजी दाखवली. हा लढवय्या पुन्हा एकदा इंग्लिश माऱ्याला भिडला. त्याने जखमी निवृत्त होताना 48 चेंडूंत 37 धावा ठोकल्या. यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याने साई सुदर्शनच्या साथीने 72 धावांची भागी रचली. पंत जखमी झाल्यानंतर साईने आपले पहिले कसोटी अर्धशतक साकारले. पण त्याची खेळी 61 धावांवर संपली. मग अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी इंग्लंडला आणखी यश मिळू दिले नाही. 83 षटकांचा खेळ झाल्यानंतर पंचांनी खेळ थांबवला.
स्टोक्सकडे ‘शोले’ चे नाणं
सध्या इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सकडे ‘शोले’ सिनेमाच्या जयकडे असलेले नाणे असल्याची चर्चा होतेय. ‘शोले’मध्ये जय जेव्हाही नाणं उडवायचा तेव्हा तोच जिंकायचा. स्टोक्सच्या बाबतीतही तेच घडतेय. गेल्या तिन्ही कसोटीप्रमाणे चौथ्या कसोटीतही शुभमन गिलविरुद्ध तोच नाणेफेक जिंकला आहे. हिंदुस्थानचा नवोदित कर्णधार गिलला अद्याप एकदाही टॉस जिंकता आलेला नाही. फक्त पहिल्या दोन्ही कसोटीत टॉस जिंकून हिंदुस्थानला फलंदाजी दिली होती तर लॉर्ड्समध्ये स्वता फलंदाजी घेतली. मात्र आज पुन्हा टॉस जिंकून हिंदुस्थानला फलंदाजीचे आमंत्रण दिले गेले.
तीन-तीन अष्टपैलू
हिंदुस्थानी संघातून अनफिट आकाश दीप बाहेर गेल्यावर त्याच्या जागी अंशुल कंबोजची निवड करण्यात आली, पण त्याचबरोबर संघात तीन-तीन अष्टपैलू खेळविण्याचा पराक्रम गिल-गंभीरने केला आहे. त्यांनी कुलदीप यादवला पिकनिकला फिरायला आणल्यासारखे आजही संघाबाहेरच ठेवले. तसेच संघात दोन अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकीवीरांना संघात कायम ठेवले, पण त्याचबरोबर शार्दुल ठाकूरलाही खेळवत संघात तिसरा अष्टपैलू खेळविला. तसेच सलग तीन कसोटी खेळलेल्या करुण नायरवर विराम लावताना साई सुदर्शनला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे तीन बदल आणि तीन अष्टपैलू असलेला संघ मँचेस्टरमध्ये उतरला.
पंतचा पाय खोलात
आधी आदळलेल्या चेंडूने ऋषभ पंतचा दंड काळानिळा केला होता. त्यानंतर लॉर्ड्स कसोटीत त्याच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो यष्टिरक्षणालाही उतरला नव्हता. त्या दुखापतीतून स्वतःला सावरत नाही तोच आज ख्रिस व्होक्सच्या एका यॉर्करला रिव्हर्स स्विप मारण्याच्या प्रयत्नात तो चेंडू थेट पंतच्या पायावर आदळला. चेंडूचा मारा इतका अचूक होता की, पंत अक्षरशः कळवळला. त्याला उभंही राहता येत नव्हते. काही सेकंदांत त्याचा पायही सूजला आणि पायाला जखमही झाली. या दुखापतीमुळे त्याला जखमी निवृत्त होऊन मैदानही सोडावे लागले. पंतसाठी या वेदना नेहमीच्याच झाल्या आहेत. त्याच्या दुखापतीमुळे संघ चिंतीत आहे. त्याची दुखापत फारशी गंभीर नसली तरी तो पुन्हा मैदानात उतरणार की नाही, याबाबत वैद्यकीय अहवालानंतरच निर्णय घेतला जाईल. असे असले तो उद्या पुन्हा मैदानात उतरेल, असा विश्वास हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना आहे.
टेस्ट कॅप नं. 318
हिंदुस्थानी संघातील दोन दीप दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यामुळे अचानक हिंदुस्थानी संघाचे द्वार उघडलेल्या अंशुल कंबोजने आश्चर्यकारकपणे कसोटी संघात स्थानही मिळवले. लीड्स कसोटीत साई सुदर्शनने पदार्पण केले होते, तर आज मँचेस्टर कसोटीत अंशुल कंबोजने 318 नंबरची टेस्ट कॅप मिळवली.