IND vs ENG Test – इंग्लंडच्या खेळाडूसमोर आक्रमक सेलीब्रेशन करणं सिराजला भोवलं, ICC नं सुनावली शिक्षा

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात लॉर्ड्स संघात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याची समान संधी आहे. त्यामुळे वर्चस्व मिळवण्यासाठी मैदानात खेळाडू आक्रमक होताना आणि त्यामुळे वातावरण तापताना दिसत आहे. तिसऱ्या दिवशीच्या शेवटच्या षटकात आणि त्यानंतर चौथ्या दिवशी दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये चांगलीच चकमक उडाल्याचे दिसले. याच दरम्यान मोहम्मद सिराज याने इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट याला बाद करत आक्रमक सेलीब्रेशन केले आणि आता ते त्याला महागात पडले आहे.

इंग्लंडच्या 387 धावांच्या प्रत्युत्तरात हिंदुस्थानचा डावही 387 धावांवर आटोपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यास 6-7 मिनिटे बाकी असताना हिंदुस्थानचा डाव संपला. त्यामुळे पुन्हा इंग्लंडला फलंदाजीला उतरावे लागले. यावेळी जास्त षटके खेळावी लागू नये म्हणून इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉली यांनी वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. यामुळे शुभमन गिल चांगलाच संतापला होता. याचे पडसाद चौथ्या दिवशीही उमटले.

चौथ्या दिवशी इंग्लंडने आपला दुसरा डाव सुरू केला. हिंदुस्थानचे गोलंदाज आग ओकत होते. यावेळी सहाव्या षटकात वेगवान गोलंदाज सिराजच्या गोलंदाजीवर बेन डकेट जसप्रीत बुमराहकडे झेल देऊन बाद झाला. विकेट मिळाल्याने सिराजने आक्रमक सेलीब्रेशन केले. सिराजने डकेटच्या जवळ जाऊन त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या खांद्याचा धक्काही डकेटला लागला. यामुळे आता आयसीसीने सिराजला सामना शुल्काच्या 15 टक्के रक्कम दंड ठोठावला असून एक डिमिरिट पॉइंटही त्याला देण्यात आला आहे.

+