खांद्यावर हात टाकला, नजरेला नजर भिडवली; टप्प्यात येताच आकाशदीपनं डकेटचा करेक्ट कार्यक्रम केला, धमाल व्हिडीओ व्हायरल

हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील निर्णायक सामना ओव्हलवर सुरू आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानचा दुसरा डाव 224 धावांमध्ये गुंडाळला गेला. त्यानंतर इंग्लंडने ‘बॅझबॉल’ स्टाईल फलंदाजी करत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू केली. पहिल्या 12 षटकांमध्ये इंग्लंडचे सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडत 7 च्या सरासरीने 92 धावा चोपल्या. मात्र आकाशदीपने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. त्याने बेन डकेट (43 धावा) याला बाद केले. विकेट घेतल्यानंतर आकाशदीपने डकेटची पवेलीयनकडे ज्या पद्धतीने पाठवणी केली त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

6 बाद 204 या धावसंख्येवरून हिंदुस्थानने दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. मात्र यात आणखी 20 धावांची भर टाकून तळाचे फलंदाज बाद झाले. हिंदुस्थानने शेवटच्या 4 विकेट्स अवघ्या 6 धावांमध्ये गमावल्या. यानंमतर इंग्लंडचे सलामीवीर मैदानात उतरले आणि सिराज-आकाशदीप-प्रसिधच्या गोलंदाजीवर त्यांनी हल्ला चढवला. दोघांनी टी-20 स्टाईल फटकेबाजी सुरू केली. यादरम्यान बॅटर आणि गोलंदाजांमध्ये शा‍ब्दिक चकमकीही होत होत्या.

बेन डकेट चांगलाच लयीत दिसत होता. हिंदुस्थानच्या गोलंदाजांवर तो चौफेर प्रहार करत होता. या दरम्यान त्याने आकाशदीपला स्कूप शॉट लगावत 6 धावा वसूल केल्या. तू मला बाद करू शकत नाही, अशा प्रकारचे आव्हानही डकेटने आकाशदीपला दिले. यानंतर 13 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आकाशदीपने बेन डकेट याला जुरेल करवी झेलबाद केले.

डकेट म्हणाला बाद करू शकत नाही आणि आकाशदीपने करून दाखवले. त्यानंतर आकाशदीपने आक्रमक सेलीब्रेशन केले आणि थेट डकेटच्या खांद्यावर हात ठेवला, नजरेला नजर भिडवली. आकाशदीपने डकेटला दिलेला सेंड-ऑफचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

दरम्यान, डकेट बाद झाल्यानंतर जॅक क्रॉली आणि ओली पोपही बाद झाला. इंग्लंड 3 बाद 142 असा सुस्थितीत असताना हिंदुस्थानच्या वेगवान माऱ्याचा तडाखा यजमान संघाला बसला आणि इंग्लंडचा डाव 247 धावांमध्ये आटोपला. त्यानंतर दिवस अखेर हिंदुस्थानने 2 बाद 75 धावा करत 52 धावांची आघाडी घेतली. यशस्वी जैस्वाल 49 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावा ठोकून नाबाद आहे. तर नाईट वॉचमन म्हणून आलेला आकाशदीप 4 धावांवर नाबाद आहे.

प्रसिध-सिराजने बॅझबॉलच्या वादळाला रोखले, 3 बाद 175 वरून इंग्लंड सर्वबाद 247; दिवसभरात उभय संघाचे 15 फलंदाज गारद