‘हिटमॅन’चे तुफानी अर्धशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात 3 विक्रमांची नोंद

14822

टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात हॅमिल्टनच्या मैदानावर तिसरा सामना रंगला. या लढतीत ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने तुफानी अर्धशतक झळकावले. रोहितने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक ठोकले आणि आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली. रोहित शर्मा याचे टी-20 क्रिकेटमधील हे विसावे अर्धशतक होते.

नाणेफेक गमावल्यानंतर सलामीला आलेल्या रोहित शर्मा याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज हॅमिश बेनेट याच्या एकाच षटकात 26 धावा चोपल्या आणि टी-20 क्रिकेटमध्ये चौथ्या वेगवान अर्धशतकाची नोंद केली. याआधी रोहितने 2016 ला 22 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. यानंतर बांगलादेश, वेस्ट इंडीज आणि आता न्यूझीलंडविरुद्ध 23 चेंडूत अर्धशतक ठोकले.

यासह रोहितने सलामीचा फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पाही गाठला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीचा फलंदाज म्हणून सर्वात वेगवान 10 हजार धावा पूर्ण करणाऱ्यांमध्ये आता रोहित दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितने अवघ्या 219 डावांमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या. पहिल्या स्थानावर अर्थातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असून त्याने 214 डावांमध्ये 10 हजार धावा चोपल्या होत्या.

विराटच्या विक्रमाची बरोबरी
न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक ठोकतात रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 धावा किंवा त्यापेक्षा अधिक धावा चोपण्याचा विक्रम केला आहे. रोहितने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली असून दोघांच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 24 अर्धशतकांची नोंद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या