
न्यूझीलंडचा हिंदुस्थान दौरा 11 जानेवारी पासून सुरू होणार आहे. प्रथम वनडे मालिका आणि त्यानंतर टी-20 मालिकेचा धुमशान सुरू होणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा विस्फोटक डावखुरा फलंदाज आणि आशिया चषकाचा हिरो तिलक वर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. आगामी टी-20 चषकाच्या दृष्टीने तिलक वर्माचं न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडणं धोकादायक मानलं जात आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा तिलक वर्माच्या खांद्यावर होती. बुधवारी (6 जानेवारी 2026) हैदाराबादविरुद्ध बंगाल सामना गुजरातच्या राजकोट स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने बंगालचा 107 धावांचा पराभव केला. याच सामन्यादरम्यान तिलक वर्माच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून सध्या त्याची तब्येत ठीक असून त्याला रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख जयदेव शहा यांनी TOI शी बोलताना दिली.
न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांच्यामध्ये 21 जानेवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला टी-20 सामना 21 जानेवारी रोजी, दुसरा टी-20 सामना 23 जानेवारी, तिसरा टी-20 सामना 25 जानेवारी, चौथा टी-20 सामना 28 जानेवारी आणि मालिकेतील शेवटचा टी-20 सामना 31 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.
































































