आजपासून हिंदुस्थानची विडींजविरुद्ध कसोटी, मायदेशात मोठय़ा विजयासाठी शुभमन गिलचा संघ सज्ज

हिंदुस्थान मायदेशातील गेल्या मालिकेतील पराभवाच्या जखमा विसरून पुन्हा नव्या जोशात वेस्ट इंडीजविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज झालाय. प्रत्येक हंगामात घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत हिंदुस्थानने मोठा विजय नोंदवावा, हीच चाहत्यांची अपेक्षा असते. पण यंदा त्यासोबत नव्या चिंताही आल्या आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील पहिली मायदेशातील कसोटी मालिका आणि आर. अश्विन, विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतरची पहिलीच कसोटी मालिका. युवा खेळाडूंचा भरणा असलेला हिंदुस्थानी संघ या मालिकेत मोठा विजय मिळवणार, हे आधीपासून भाकित वर्तवले जात आहे.

आशिया कपचे वादळ अजून शमले नाही आणि हिंदुस्थानी संघ आता नव्या मालिकेसाठी सज्ज झालाय. वेस्ट इंडीजविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी कर्णधार शुभमन गिलने फलंदाज किंवा गोलंदाजाला मदत करणाऱ्या खेळपट्टीऐवजी दोघांना न्याय देणाऱ्या स्पार्ंटग खेळपट्टीवर आपल्याला खेळायचे असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे फलंदाज असो किंवा गोलंदाज दोघांनाही समान संधी मिळू शकेल, असा सूर घेतल्यामुळे अहमदाबादची खेळपट्टी आपला कोणता रागरंग दाखवतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

गिलने आपल्या कर्णधारपदाच्या पहिल्याच मालिकेत धावांचा पाऊस पाडत कर्णधार आणि फलंदाज म्हणून दुहेरी पराक्रम केला होता. आताही तो त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करायला सज्ज झालाय. मात्र आता तो वेगळय़ाच स्वरात बोलत होता. तो म्हणाला, माझ्या कर्णधारपदापूर्वी काय चर्चा झाली होती, त्याबद्दल मी बोलू शकत नाही. पण आम्हाला अशा विकेटवर खेळायचे आहे, ज्या दोन्ही बाजूंना मदत करतील. लढत तुल्यबळ असेल तर लढायलाही तितकीच मजा येते.

तिसऱ्या वेगवान गोलंदाजाला संधी

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी पिचवर गवत असल्याचे पाहून गिलने संकेत दिले की तिसऱ्या वेगवान गोलंदाजाला संधी दिली जाऊ शकते. मात्र उद्या हवामान आणि परिस्थिती पाहूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. एकंदरीत उद्या तिसरा वेगवान गोलंदाज उतरवण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानात खेळणाऱ्या कोणत्याही संघासाठी स्पिन आणि रिव्हर्स स्विंग हे मोठे आव्हान असते.

तयारीसाठी कमी वेळ

शुभमन गिलने मान्य केले की, आशिया कप स्पर्धेत खेळल्यानंतर कसोटी मालिकेसाठी फक्त दोन दिवसांची तयारी करण्यासाठी मिळाली. इतक्या जलदगतीने दुसऱ्या फॉरमॅटमध्ये खेळणे सोपे नसते, पण आम्ही नेट्सवर कठोर परिश्रम घेतले आहेत.