मग नितीशला घेतलेच कशाला? अश्विनचा बीसीसीआयच्या निवडीवर सवाल

हिंदुस्थानचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा मैदानाबाहेरच्या चर्चेत झळकला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या 2-0 च्या क्लीन स्वीपनंतर त्याने निवड समितीवर चांगलंच बोट ठेवलं आहे. कारण सोप्पे आहे, नितीश रेड्डीला घेतले, पण त्याला गोलंदाजीच नाही दिली… मग घेतलेच कशाला?

अश्विनच्या मते, जर नितीशची भूमिका फक्त फलंदाजीपुरती असेल तर संघाने एखादा स्पेशालिस्ट फलंदाज किंवा अनुभवी ऑलराऊंडर घ्यायला हवा होता. अक्षर पटेलला का घेतलं नाही? त्याने काय कमी केले आहे? कित्येक वेळा तो सामना जिंकवून देतो तरी तो ड्रेसिंगरूममध्ये बसतो, असं अश्विनने आपल्या ‘यूटय़ूब’ शोवर मिश्कीलपणे विचारले. वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या डावात 390 धावा झाल्या, पण नितीश रेड्डीला एकही ओव्हर मिळाली नाही. अश्विन म्हणाला, जर गोलंदाजालाच चेंडू देणार नाही तर मग प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला घेताय कशाला? अक्षर पटेल हा फिरकीविरुद्ध फलंदाजी करणाऱ्यांमध्ये सर्वात स्थिर आहे. जर तुम्ही फक्त फलंदाजीच्या खोलीसाठी खेळाडू शोधत असाल तर नितीश योग्य आहे, पण संतुलनासाठी अक्षरच योग्य निवड आहे. टीमला पुढच्या मालिकांपूर्वी भूमिका स्पष्ट ठेवल्या पाहिजेत, नाहीतर पुढच्यावेळी गोलंदाज बघत राहतील आणि कर्णधार चेंडू फक्त हवेत फिरवत बसेल.

अश्विनच्या वक्तव्यामुळे निवड धोरणावर नवी चर्चा पेटली आहे. आता प्रश्न असा की, हिंदुस्थानचा संघ ‘परफॉर्मन्स’वर खेळाडू निवडतोय की ‘एक्सपेरिमेंट’वर? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढच्या मालिकेत पाहायचं राहील की, बीसीसीआय पुन्हा फिरकी लावतो की पुन्हा एखाद्या ऑलराऊंडरचा बॉल ‘साठवून’ ठेवतो.