
रणजी ट्रॉफीत आंध्र प्रदेशविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करून अर्धशतकासह चार बळी टिपणारा फिरकीपटू मानव सुथारने हिंदुस्थानी ‘अ’ संघात संधी मिळताच कमाल केली. त्याने दुसऱ्या अनधिकृत कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाची फिरकी घेत 5 बळी टिपण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 9 बाद 350 धावसंख्येपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टॉड मर्फी 29, तर हेन्री थॉर्नटन 10 धावांवर खेळत होते.
रणजी ट्रॉफीत आंध्र प्रदेशविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करून अर्धशतकासह 4 बळी घेणारा मानव सुथार त्यानंतर दीर्घकाळ केवळ संघासोबत प्रवास करत होता. आयपीएलमधील गुजरात टायटन्ससह, हिंदुस्थान ‘अ’ संघासोबतचा इंग्लंड दौरा, तसेच दुलीप ट्रॉफीमध्ये मध्य विभागाचा सदस्य असतानाही त्याला मैदानात उतरायची संधी मिळाली नव्हती. मात्र, ऑस्ट्रेलिया-‘अ’विरुद्ध दुसऱ्या कसोटीत त्याला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोनं केलं. अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत सुथारने 28 षटकांत 93 धावांच्या मोबदल्यात 5 बळी घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचा हा बळीचा पाचवा ‘पंच’ ठरला. 3 बाद 144 अशा सुस्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाला त्याने खिळखिळे केले आणि पहिल्या दिवसाखेरीस पाहुण्यांची 9 बाद 350 अशी अवस्था केली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार नेथन मॅकस्वीनी (74) आणि जॅक एडवर्डस् (88) यांनी झुंजार खेळी केली. याशिवाय सॅम कॉन्स्टासने 49 धावा जोडल्या.
हिंदुस्थान ‘अ’ संघाचा कर्णधार ध्रुव जुरेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रसिध कृष्णाने चौथ्याच षटकात कॅम्पबेल केलावेला सुदर्शनकरवी झेलबाद केले. मात्र, मोहम्मद सिराज महागडा ठरला. त्याने 13 षटकांत 73 धावा दिल्या. कॉन्स्टासने उपाहारानंतर सिराजच्या उसळत्या चेंडूवर यष्टीमागे एन. जगदीशनकडे झेल दिला.