जगभरातील ४० टक्के लोक न्यूरोलॉजिकल आजारांनी ग्रस्त, WHO ने व्यक्त केली चिंता

जगभरातील ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या न्यूरोलॉजिकल आजारांनी प्रभावित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नमूद केले आहे. या चिंताजनक आकडेवारीमुळे न्यूरोलॉजिकल विकारांच्या वाढत्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज WHO ने व्यक्त केली आहे.

WHO च्या अहवालानुसार, मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजार, जसे की डोकेदुखी, अल्झायमर, पार्किन्सन्स आणि स्ट्रोक यांसारख्या न्यूरोलॉजिकल समस्या जगभरात झपाट्याने वाढत आहेत. यामागील प्रमुख कारणांमध्ये तणाव, बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि अपुरी आरोग्य सुविधांचा समावेश आहे. विशेषत: कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये या आजारांचे प्रमाण अधिक आहे. जिथे उपचार आणि निदानाच्या सुविधा मर्यादित आहेत.

WHO ने व्यक्त केली चिंता

WHO ने या समस्येच्या प्रकाश टाकताना न्यूरोलॉजिकल आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे म्हटले आहे. यामध्ये आरोग्य सुविधांचा विस्तार, निदान आणि उपचार यंत्रणेची सुलभता, तसेच लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यावर भर देण्यात सांगितले आहे. तसेच मानसिक आणि न्यूरोलॉजिकल आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी सरकार आणि आरोग्य संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन WHO ने केले आहे.

दरम्यान, हिंदुस्थानातही न्यूरोलॉजिकल विकारांचे प्रमाण चिंताजनक आहे. शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये तणाव, अपुरी आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे ही समस्या गंभीर बनत आहे. WHO च्या या अहवालामुळे हिंदुस्थानातही न्यूरोलॉजिकल आरोग्यावर अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.