‘इंडिया’च्या सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत चुरस; महाराष्ट्रात फोनाफोनी

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. रेड्डी यांच्या रुपाने माजी न्यायमूर्ती रिंगणात असल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. ‘इंडिया’ची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचवेळी भाजपनेही फोनाफोनी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांशी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपर्क साधत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून त्यांनी पाठिंब्याची मागणी केली आहे.

उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबरला निवडणूक होत आहे. भाजपप्रणित एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत एनडीएच्या नेत्यांनी दिले होते. मात्र उमेदवार ठरवताना विचारात न घेतल्याने इंडिया आघाडीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व एकमताने उमेदवार दिला. ‘इंडिया’नेही दाक्षिणात्य उमेदवार दिल्याने विरोधी पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा भाजपचा डाव फसला आहे. त्यातच इंडिया आघाडीने निवडणुकीसाठी भक्कम मोर्चेबांधणी केल्यामुळे एनडीएला विरोधी पक्षांच्या विनवण्या कराव्या लागत आहेत.

महाराष्ट्र महत्त्वाचा का?

महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडे लोकसभेतील 31 खासदार आहेत. त्यात काँग्रेसचे 13, शिवसेनेचे 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार आहेत. तर, एक अपक्ष खासदार काँग्रेसशी संबंधित आहेत. राज्यसभेतही महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे चांगले संख्याबळ आहे. ही मते महत्त्वाची ठरणार आहेत.

भाजपकडून फडणवीसांवर जबाबदारी

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी टाकली असून त्यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आणि राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. एनडीएच्या घटक पक्षांमध्ये भाजपविषयी नाराजी आहे. त्यामुळे घटक पक्षांचे सर्वच खासदार भाजपच्या उमेदवाराला मतदान करतील अशी शक्यता नाही. त्यामुळेच भाजपची धाकधूक वाढली आहे.