चीनसोबतची चर्चा सफळ, चिनी सैनिक एक पाऊल पाठी घेणार

2685

गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे हिंदुस्थान आणि चीनमधील संबंध तुटायला येईपर्यंत ताणले गेले होते. या युद्धसदृश्य परिस्थितीमध्ये दोन्ही देशांनी चर्चेचे दरवाजे खुले ठेवले होते. मंगळवारी या चर्चेचा सकारात्मक परिणाम दिसून आला.  ज्या भूभागावरून संघर्ष झाला होता तिथून आपले सैनिक पाठी हटवण्यास चीनने होकार दिला आहे.

दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल स्तरावर बातचीत झाली. नवभारत टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये म्हटलंय की लडाखमधील सैन्याने माघारी येण्यासंदर्भात उपाययोजनांना अंतिम रुप देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. हिंदुस्थानी सैन्य अधिकाऱ्यांनी चिनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की 5 मे पूर्व प्रत्यक्ष ताबा रेषेवर जशी परिस्थिती होती तशी झाली पाहिजे. याचा अर्थ हा आहे की हिंदुस्थानने चीनला त्यांचे सैन्य माघारी घ्यावे असे सुनावले होते. दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल यांनी सीमेवर तणाव निवळून शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी बातचीत केली आणि यासाठी सामंजस्याची भूमिका स्वीकारली होती. 15 जूनला झालेल्या हिंसक झडपेमध्ये हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते तर चीनचे किमान 40 जवान आपल्या जाबांज जवानांनी यमसदनी पाठवल्याचे वृत्त आहे. याला अद्याप चीनकडून दुजोरा मिळालेला नाही. 3500 किलोमीटरच्या प्रत्यक्ष ताबारेषेदवळच्या परिसरात दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव सुरू केली होती.

या संवादाच्या प्रक्रियेमध्ये हिंदुस्थानकडून लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग सहभागी झाले होते तर चीनकडून तिबेट विभागाच्या एका सैनिकी अधिकाऱ्याने यात भाग घेतला होता. ताबारेषेच्या पलिकडे असलेल्या आणि चीनच्या ताब्यातील मोल्डो भागात झाली होती. जवळपास 12 तास ही बैठक चालली. सोमवारी या बैठकीला सुरुवात झाली आणि मंगळवारी दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्याचे मान्य केले. ज्या भागांमध्ये तणाव आहे तिथे तो कमी कसा करता येईल याबाबतही बैठकीमध्ये चर्चा झाली.

आपली प्रतिक्रिया द्या