
गाव असो वा शहर, सध्याच्या जमान्यात प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. मोबाईलवर विविध अॅप्स किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी इंटरनेटची गरज भासते. डिजिटल व्यवहार इंटरनेटशिवाय अशक्य आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात देशात इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. देशात 100 कोटींपेक्षा जास्त इंटरनेट युजर्स असल्याचे ट्रायच्या अहवालातून समजते.
दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अहवालानुसार, जून 2025 पर्यंत देशातील इंटरनेट ग्राहकांची संख्या 100.28 कोटींहून जास्त झाली आहे. यात मार्च 2025 च्या तुलनेत या संख्येत 3.48 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये वायरलेस इंटरनेट युजर्सची संख्या 95.81 कोटी, तर वायर इंटरनेट ग्राहकांची संख्या 4.47 कोटी आहे. या आकडेवारीवरून देशातील वाढता इंटरनेटचा वापर आणि ब्रॉडबॅण्ड सेवांची मागणी दिसून येते.
ट्रायने 30 जून 2025 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीचा दूरसंचार सेवा प्रदर्शन अहवाल नुकताच जारी केला. या अहवालानुसार, देशात डिजिटल आणि दूरसंचार सेवांचा विस्तार झाला आहे. एप्रिल ते जून 2025 दरम्यानच्या तिमाहीत इंटरनेट, टेलिफोन आणि डिजिटल मीडिया सर्व्हिसमध्ये खूप बदल दिसून आले. देशातील वाढती डिजिटल कनेक्टिविटी त्यातून दिसून येते.
ग्राहक इंटरनेटवर किती खर्च करतात?
वायरलेस इंटरनेट सेवेचा विचार करता जून 2025 मध्ये प्रति ग्राहक मासिक खर्च सरासरी 186.62 रुपये झाला. प्रिपेड सेंगमेटमध्ये प्रति ग्राहक मासिक खर्च सरासरी 187 रुपये झाला. प्रिपेड ग्राहकांनी महिन्याला 1055 मिनिटे, तर पोस्टपेड ग्राहकांनी महिन्याला 503 मिनिटे इंटरनेटचा वापर केला.
महिन्याला किती डेटा
ट्रायच्या अहवालानुसार, प्रत्येक ग्राहक महिन्याला 24 जीबी डेटाचा वापर करत आहे. मोबाईल कंपन्याना या डेटा वापरावर दर महिन्याला 8.51 रुपये प्रति जीबी दराने पैसे मिळत आहेत.
एप्रिल ते जून 2025 च्या तिमाहीत 71.20 नवीन ग्राहक इंटरनेट सेवेत जोडले गेले. यामध्ये एकूण वायरलेस ग्राहक 116 कोटींवरून 117 कोटी झाले.