
आज हिंदुस्थानला नेमबाजीत अनपेक्षित पदक लाभले असले तरी हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंगमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. हॉकीत हिंदुस्थानला बलाढ्य बेल्जियमविरुद्ध 1-2 ने हार सहन करावी लागली तर पदकाचे दावेदार असलेल्या सात्त्विक साईराज रांवीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडीचाही पराभव झाला. मात्र पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने हिंदुस्थानच्या एच. एस. प्रणॉयचा 21-12, 21-6 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्क फेरी गाठली.
हिंदुस्थानने हॉकीत बेल्जियमकिरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र तिसऱया सत्रात बेल्जियमच्या थिबू स्टॉकब्रोक्सने 33 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली तर जॉन-जॉन डोमेनने 44 व्या मिनिटाला आघाडी मिळवून देणारा गोल केला. मग ही आघाडी शेवटपर्यंत टिकवत बेल्जियमने हिंदुस्थानवर 2-1 फरकाने विजय साकारला.
सिंधूचे आव्हान संपुष्टात
दोन वेळची ऑलिम्पिकपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचेही पॅरिस ऑलिम्पिकमधील आव्हान गुरुवारी संपुष्टात आल्याने हिंदुस्थानला मोठा धक्का बसलाय. चीनच्या बिंग जिआओ हिने उप उपांत्यपूर्व फेरीत सिंधूवर 21-19, 21-14 अशी मात केली.
रांवीरेड्डी-शेट्टीला अपयश
बॅडमिंटन पुरुष दुहेरीत सातत्याने जेतेपदे पटकाकणाऱया सात्त्विक साईराज रांवीरेड्डी आणि चिराग शेट्टी या धडाकेबाज जोडीला पहिल्या सेटमध्ये घेतलेली आघाडी राखता आली नाही आणि तासाभराच्या संघर्षानंतर मलेशियन जोडी आरोन चिया आणि सोह कुई इवकडून 21-13, 14-21, 16-21 अशी हार सहन करावी लागली. त्यामुळे त्यांचे पदकाचे स्वप्न उपांत्यपूर्क फेरीतच भंग पावले.