हिंदुस्थानची पावले पुन्हा राष्ट्रकुल यजमानपदाच्या दिशेने

2010 सालच्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा वाईट अनुभव विसरून हिंदुस्थानने पुन्हा एकदा यजमानपदाच्या दिशेने पावले टाकली आहेत. हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी उत्सुक असून अहमदाबाद शहराला आयोजनाची संधी दिली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. हा निर्णय नवी दिल्ली येथे झालेल्या ‘आयओए’च्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आला. राष्ट्रकुल स्पर्धांच्या यजमानपदासाठी फारसे कुणी देश उत्सुक नसल्यामुळे 2030 च्या आयोजनाची संधी हिंदुस्थानलाच मिळणार हे निश्चित मानले जात आहे.

हिंदुस्थानने या यजमानपदाचे इच्छुक पत्र आधीच राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडे सादर केले आहे. आता अंतिम बोली प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ठरवण्यात आली आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत आधी पॅनडाचेही नाव होते, मात्र त्यांनी आधीच माघार घेतली आहे. तसेच स्पर्धा आयोजनाच्या शर्यतीत भुवनेश्वर आणि दिल्लीचेही नाव असले तरी पेंद्र सरकारच्या वरदहस्तामुळे यजमान शहर म्हणून अहमदाबादचेच नाव निश्चित आहे. तसेच उर्वरित दोन्ही शहरांमध्येही या स्पर्धांतील काही खेळ आयोजित केले जाण्याची शक्यता आहे.