बांगलादेशात आरक्षणाविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचार अजूनही पेटत आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. दरम्यान आता बांगलादेशमध्ये होणारा महिला टी-20 विश्वचषक 2024 लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात होणार होती. मात्र बांगलादेशची सध्याची परिस्थिती लक्षात घेता तेथे विश्वचषकाचे आयोजन करणे कठीण होणार आहे.
टी-20 विश्वचषक स्पर्धा बांगलादेशाबाहेर आयोजित केली तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही, असे वृत्त क्रिकबजने दिले आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून देशात हिंसाचार सुरू असून गेल्या दोन दिवसात 100 हून अधिक नागरिकांचे प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीमुळे अनिश्चित काळासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय देशात इंटरनेटही बंद आहे. दरम्यान, विश्वचषक स्पर्धेच्या संदर्भातील आयसीसीचा निर्णय एका आठवड्यात येण्याची शक्यता आहे.
टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकात बांगलादेशातील दोन ठिकाणांचा समावेश
महिला टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकात बांगलादेशच्या दोन ठिकाणांचा समावेश करण्यात आला होता. ढाका येथील शेर ए बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियम आणि सिल्हेटमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम या दोन स्थळांचा समावेश आहे. ही स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे. या कालावधीत एकूण 23 सामने होणार आहेत. मात्र बांगलादेशातील हिंसाचारामुळे विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात खेळली जाणार का? याबाबत अद्यापपर्यंत आयसीसी किंवा बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.