
हिंदुस्थानातील खेळाडू डोपिंगमुक्त रहावे यासाठी राष्ट्रीय अॅण्टी डोपिंग एजन्सीने (नाडा) मोबाईल अॅपची निर्मिती केली असून याचे अनावरण केंद्रीय क्रीडामंत्री किरण रीजिजू यांनी मंगळवारी केले.
नाडा व खेळाडू यांच्यामधील दरी कमी करण्यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपद्वारे खेळाडूंची माहिती नाडाला सहज उपलब्ध होणार आहे. तसेच कोणत्या औषधांवर बंदी लादण्यात आलेली आहे. या औषधांची माहितीही खेळाडूंना या अॅपद्वारे मिळणार आहे. त्यामुळे प्रतिबंधित औषधांबाबत जाणून घेण्यासाठी खेळाडूंना इतर कोणाला विचारण्याची गरज यावेळी पडणार नाही.
जलद डोप टेस्ट होणार
या अॅपद्वारे खेळाडू व नाडा यांच्यामध्ये योग्य समन्वय साधला जाईल. एवढेच नव्हे तर खेळाडूंच्या डोप टेस्टलाही वेळ लागणार नाही. सर्व प्रकिया जलदगतीने होतील. गुगल स्टोअरवर नाडाचे हे अॅप उपलब्ध असणार आहे. खेळाडू व प्रशिक्षकांना हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.

























































