
अमेरिका, चीन आणि हिंदुस्थान या जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. मात्र यापैकी कोणताही देश जगातील टॉप-10 स्थिर अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट नाही. संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएई या देशाची अर्थव्यवस्था जगात सर्वात मजबूत आहे. जगातील मोठय़ा अर्थव्यवस्थांपैकी केवळ जर्मनी आणि जपान या देशांनाच या यादीत स्थान मिळाले आहे. म्हणजेच सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून एकीकडे मोदी सरकार मिरवत असले, तरी हिंदुस्थानची अर्थव्यवस्था मजबूत नाही, हेच या अहवालातून स्पष्ट होते. या यादीने मोदी सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
देशाची रँकिंग 47 व्या स्थानी
सर्वात मजबूत अर्थव्यवस्थांच्या यादीत हिंदुस्थान 47 व्या स्थानी आहे. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. हिंदुस्थानच्या मागे ब्राझील, इजिप्त, मेक्सिको, केन्या, युव्रेन, इराण, बांगलादेश यासारखे देश आहेत. न्यूज अॅण्ड वर्ल्ड रिपोर्टनुसार हिंदुस्थानच्या ‘मजबूत’ अर्थव्यवस्थेचा फुगा फुटला आहे.
अमेरिकेच्या न्यूज अॅण्ड वर्ल्ड रिपोर्टच्या यादीनुसार, यूएईपाठोपाठ स्वित्झर्लंड, जर्मनी, पॅनडा, जपान, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, डेन्मार्क, नेदरलँड आणि सौदी अरब या देशांचा सर्वात मजबूत अर्थव्यवस्थांच्या यादीत टॉप 10मध्ये समावेश आहे. सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थांच्या यादीत जर्मनी तिसऱ्या तर जपान पाचव्या स्थानी आहे.
अमेरिकेला कोणते स्थान?
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला अमेरिका हा या यादीत तेराव्या स्थानी आहे. याशिवाय चीन 19व्या स्थानी आहे. या यादीमध्ये युरोपमधील बहुतांश देश टॉप 25मध्ये आहेत.




























































