पाकच्या कुरघोड्या सुरूच; जम्मूमध्ये हिंदुस्थानी ड्रोनवर गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात पाकिस्तानने पुन्हा एकदा चिथावणीखोर कृत्य केले आहे. कनाचक सेक्टरमध्ये आपल्याच हद्दीत नियमित टेहळणी करत असलेल्या हिंदुस्थानी रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्टवर (RPA) पाकिस्तान्यांकडून गोळीबार केला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून हिंदुस्थानी ड्रोन सुरक्षितपणे आपल्या तळावर परतले आहे. या घटनेमुळे सीमेवर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री कनाचक सेक्टरमधील पाकिस्तानी चौक्यांमधून हिंदुस्थानी ड्रोनच्या दिशेने एकूण पाच राऊंड झाडण्यात आल्या. यामध्ये पाकिस्तानच्या ‘खेरी’ चौकीतून चार आणि ‘अस्लम’ चौकीतून एक गोळी झाडण्यात आली. हिंदुस्थानी ड्रोन आपल्या सीमा हद्दीत असतानाच हा हल्ला करण्यात आला, मात्र, त्यातून ड्रोन बचावले आहेत.

पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमावर्ती भागात सध्या तणावाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी ड्रोन आणि बलूनच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे. तसेच, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मिळणारा पाठिंबा हिंदुस्थानसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस अत्यंत सतर्क असून, सीमावर्ती भागात शोधमोहीम राबवली जात आहे.