विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; देशभरात संतापाची लाट

drone attacked in jammu and kashmir

पहलगामवर दहशतवादी हल्ला करत घात करणाऱ्या पाकिस्तानने आता शस्त्रसंधीचे उल्लंघनकरून विश्वासघात केल्याने हिंदुस्थानात संतापाची लाट उसळली आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी दुपारी युद्धविरामावर एकमत झाले होते. सीमेवरील संघर्ष घमासान युद्धाच्या दिशेने जात असताना दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केली. मात्र अवघ्या काही तासांमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ही पाकिस्तानच्या आगळीकीवर संताप व्यक्त केला.

जम्मू आणि कश्मीरमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याचे वृत्त हाती आले आहे. श्रीनगरच्या आकाशात ड्रोन पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार हिंदुस्थानच्या लष्कराने पाकिस्तानकडून सोडण्यात आलेल्या ड्रोनपैकी चार ड्रोन ध्वस्त करण्यात आले आहेत.

जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी X सोशल मीडिया हँडलवर संताप व्यक्त केला आहे. युद्धबंदीचे काय झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

यादरम्यान श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट घोषित करण्यात आले आहे. बारामुल्लामध्येही ब्लॅकआउट घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तान सध्या अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा येथे मोठ्याप्रमाणात गोळीबार करत आहे. बारामुल्लामध्ये एक ड्रोन पाडण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

जम्मूच्या अनेक भागात ब्लॅकआउट घोषित करण्यात आले आहे. पंजाबमधील पठाणकोट आणि गुरुदासपूरमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आला आहे.