
मुरली खूप हट्टी होता. वर्दी त्याचे स्वप्न होतेय. मी नकार दिला पण तो अग्निवीर झाला. त्याने शेवटच्या क्षणीही त्याची इच्छा पूर्ण केली. मी माझा एकुलता एक मुलगा गमावला… असे सांगताना शहीद मुरली नाईक यांच्या वडीलांना अश्रू अनावर झाले.
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात मुरली नाईक यांचा मृत्यू झाला. त्यांचे वडील श्रीराम नाईक म्हणाले, तो रोज सकाळी आम्हाला व्हिडियो कॉल करायचा. 8 मे रोजी सकाळी तो व्हिडियो कॉलवरही बोलला. बाबा कसे आहात, मला विचारले. आज मी पूर्ण दिवस आराम करेन, असे म्हणाला. त्यानंतर त्याचा फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लष्करी अधिकाऱयांनी सांगितले की मुरली पाकिस्तानी गोळीबारात शहीद झाला.
श्रीराम नाईक पुढे म्हणाले, मुरली देशासाठी लढला याचा मला आनंद आहे. तो फक्त 26 वर्षांचा होता. लहानपणापासून त्याला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. आमच्या विरोधाला न जुमानता, तो अग्निवीरमध्ये भरती झाला. मुरलीला कोणत्याही किंमतीत लष्कराचा गणवेश घालायचा होता. तो नेहमी काश्मिरमधील त्याच्या पोस्टींगबद्दल लपवून ठेवायचा. मुरली नाईक आंध्रप्रदेशातील गोरंटला मंडळातील श्री सत्य साई जिह्यातील कल्लीथंडा गावाचे रहिवासी होते. सैन्यात नॉर्दर्न कमांडच्या 851 लाईट रेजिमेंटचे सैनिक होते. काश्मीरमधील उरी नियंत्रण रेषेवर त्यांची पोस्टींग होती. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात मुरली नाईक शहीद झाले.
अग्निवीर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुरली नाईक नोव्हेंबर 2022 मध्ये लष्करात भरती झाले. त्यांनी नाशिकमधील देवळाली येथे प्रशिक्षण पूर्ण केले. नुकतेच ते आपल्या कुटूंबासह आंध्र प्रदेशला परतले होते. मुरली यांना नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आले होते. त्यांना एक दिवस आधी सीमेवर डयुटी देण्यात आली होती. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले. त्यांना नवी दिल्लीला नेण्यात आले. पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
9 मे रोजी सकाळी मुरली यांच्या कुटुंबाला त्याच्या शहीद झाल्याची बातमी मिळाली. जेव्हा त्याच्याबद्दल टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या, तेव्हा गावकरीही त्याच्या घरी जमू लागले. मुरलीचे वडील श्रीराम नाईक गावातच शेती करतात. पूर्वी तो मुंबईत मजूर म्हणून काम करायचा. त्याच्या मुलाला सैन्यात नोकरी मिळाल्यानंतर ते गावी आले.
आई ज्योतिबाई घर सांभाळतात.