इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये भविष्यात ई-पासपोर्टची निर्मिती

414

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चिप असलेले ई-पासपोर्ट अत्यावश्यक असून, त्यादृष्टीने पावले उचलत ही छपाई नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये केली जाईल, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी जाहीर केल्याने प्रेस कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे काम उपलब्ध झाल्यापासून पुढील पंधरा ते वीस वर्षे सुरू राहील, हा दिलासा आहे, असे प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी सांगितले.

नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये सुरुवातीपासूनच पासपोर्ट छपाईचे काम केले जाते, त्याचबरोबर स्टॅम्प तयार होतात. पासपोर्ट कार्यालयाकडून पासपोर्टची छपाई होत असते. मागील वर्षी येथे सुमारे एक कोटी 54 लाख इतके पासपोर्ट तयार करण्यात आले.

नुकतीच परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी चिप एनेबल्ड ई-पासपोर्ट र्निमितीची घोषणा केली. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून डिजीटलायझेशनवर भर देण्याचे ध्येय आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ई-पासपोर्ट तयार केले जातील, असे सांगून त्यांनी नाशिकच्या ‘आयएसपी’सोबत याबाबत आपण काम करीत असल्याचे नमूद केले. सध्या आयएसपीत नियमित काम सुरू आहे. भविष्यात ई-पासपोर्टच्या छपाईला सुरुवात होईल. हे काम सुरू झाल्यानंतर पंधरा ते वीस वर्षे येथे कामाची टंचाई भासणार नाही. ई-पासपोर्ट निर्मिती आयएसपीकडे सोपवली जाणार असल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या