
इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीयांनी आठवडय़ाला 70 तास काम करावे, असा सल्ला दिला होता. त्यावर मोठय़ा प्रमाणात चर्चा झाली होती. त्यांच्या या मतावर त्या वेळी जोरदार टीकाही झाली होती. मात्र आता मूर्ती यांनी पुन्हा एकदा तोच सल्ला देत चीनच्या वर्क कल्चरचे उदाहरण देत 72 तास कामाचा मुद्दा परत पुढे आणला आहे. एका मुलाखतीत बोलताना मूर्ती यांनी चीनमधील ‘9-9-6 मॉडेल’चा संदर्भ देत म्हटले की, हिंदुस्थानला आर्थिकदृष्टय़ा पुढे जायचे असेल, तर विशेषतः तरुणांनी जास्त वेळ काम करणे गरजेचे आहे.
चीनचे 9-9-6 मॉडेल काय आहे?
चीनमधील अनेक टेक कंपन्यांमध्ये वर्षानुवर्षे ‘9-9-6 वर्क कल्चर’ होते. या मॉडेलनुसार कर्मचारी सकाळी 9 ते रात्री 9 अशा 12 तासांची डय़ुटी करत. आठवडय़ात 6 दिवस ही डय़ुटी करावी लागे. म्हणजे आठवडय़ाला तब्बल 72 तासांचे काम करत. अलीबाबा, हुवावे यांसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये हे मॉडेल मोठय़ा प्रमाणावर वापरले जात असे आणि चीनच्या झपाटय़ाने वाढलेल्या अर्थव्यवस्थेच्या मागे हेच मॉडेल असल्याचे अनेकांचे मत होते, पण वर्क-लाइफ बॅलन्सचा अभाव, वाढता मानसिक आणि शारीरिक त्रास व कर्मचाऱ्यांवरील ताण या कारणांमुळे या मॉडेलवर मोठय़ा प्रमाणावर टीका झाली. 2021 मध्ये चीनच्या सर्वोच्च न्यायालयाने हे मॉडेल अवैध ठरविले. तरीही अनेक ठिकाणी हे नियम अद्याप पाळले जात असल्याचे अहवाल सांगतात. दरम्यान, नारायण मूर्ती यांच्या 72 तासांच्या सल्ल्यावर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. हिंदुस्थानात आधीच ट्रॅफिक, महागाई आणि कमी पगाराच्या नोकऱ्या आहेत, त्यामुळे आठवडय़ाला 72 तास काम करणे शक्य होणार नाही, असे अनेक यूजर्संनी कमेंट करत म्हटले आहे. 72 तास काम करायचे असेल तर त्या तुलनेत पगारही तितका असायला हवा, असे दुसऱ्या यूजर्सने म्हटले आहे.





























































