
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) ‘लीडरशिप फॉर पीस’ या विषयावरील खुल्या चर्चेत हिंदुस्थानने पाकिस्तानला फटकारले. हिंदुस्थानचे राजदूत हरीश पर्वतानेनी यांनी पाकिस्तानला जागतिक दहशतवादाचे केंद्र म्हटले आणि सीमेपलीकडील दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला.
पाकिस्तानने जम्मू-कश्मीर आणि सिंधू जलकराराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हिंदुस्थानने उत्तर देताना म्हटले की, जम्मू-कश्मीर आणि लडाख हे हिंदुस्थानचे अविभाज्य भाग आहेत आणि नेहमी राहतील. पाकिस्तानच्या अनावश्यक उल्लेखांमुळे त्याची हिंदुस्थानला हानी पोहोचवण्याची धोकादायक मानसिकता दिसते.
हिंदुस्थानने सिंधू जलकरार स्थगित ठेवण्याचे समर्थन करताना सांगितले की, ६५ वर्षांपूर्वी सद्भावनेने हा करार केला होता. पण पाकिस्तानने तीन युद्धे आणि हजारो दहशतवादी हल्ले करून त्याचा भंग केला. एप्रिल २०२५ मधील पहलगाम हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांची धर्माच्या आधारावर हत्या झाली, हे पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंब्याचे उदाहरण आहे.

























































