ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी 15 सदस्यीय ‘टीम इंडिया’ची घोषणा केली. या संघाची धुरा पुन्हा एकदा अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्या खांद्यावर सोपविण्यात आली असून मराठमोळी स्मृती मानधना हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर तीन राखीव खेळाडूही संघासोबत जाणार असून दोन राखीव खेळाडूंना मायदेशातच ठेवण्यात आले आहे. फिरकीपटू श्रेयांका पाटीलची निवड झाली असली तरी तिच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे.
‘यूएई’मध्ये 3 ते 20 ऑक्टोबरदरम्यान महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवड झालेल्या हिंदुस्थानी संघात अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. स्मृती मानधना, शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या अनुभवी खेळाडूंची संघात वर्णी लागली आहे. त्यांच्यासोबत जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि यास्तिका भाटिया यांनाही संधी मिळाली आहे. पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, हेमलता, शोभना आणि राधा यादव यांचीही संघात निवड झाली आहे. अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटीललाही संघात स्थान देण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या ‘आशिया चषक’दरम्यान झालेल्या बोटाच्या दुखापतीतून पाटील अद्यापि सावरलेली नाही. श्रेयांका पाटील दुखापतीचा सामना करीत असून ती दुखापतीतून सावरल्यानंतरच संघासोबत वर्ल्ड कपसाठी जाणार आहे. हिंदुस्थानी महिला 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या टी-20 वर्ल्ड कपच्या अभियानास प्रारंभ करतील. हिंदुस्थानी संघ स्पर्धेत गटफेरीचे एकूण चार सामने खेळणार आहे. यांतील तीन सामने दुबईत, तर एक सामना शारजामध्ये होणार आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तान 6 ऑक्टोबरला भिडणार
हिंदुस्थान आणि पाकिस्तान या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील सामन्याची चाहते आतुरतेने वाट बघत असतात. टीम इंडिया 6 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. टीम इंडिया गटफेरीतील शेवटचा सामना 13 ऑक्टोबरला शारजामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी 9 ऑक्टोबरला हिंदुस्थानची गाठ श्रीलंकेशी पडणार आहे.
महिला टी-20 वर्ल्ड कपसाठीचा हिंदुस्थानी संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टिरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी , रेणुकासिंह ठापूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना सजीवन.
संघासोबत राखीव ः उमा छेत्री (यष्टिरक्षक), तनुजा पंवर, सायमा ठाकोर.
मायदेशातील राखीव ः राघवी बिस्ट, प्रिया मिश्रा.