
हिंदुस्थान ‘अ’ संघाने सोमवारी येथे झालेल्या तिसऱ्या वन डे लढतीत (अनधिकृत) पाहुण्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला 4 गडी व 13 चेंडू राखून हरवत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. 81 धावा करणाऱ्या मनीष पांडे याची या लढतीत ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. आता उभय संघांमध्ये उद्या चौथी लढत रंगणार आहे. उर्वरित दोन लढतींसाठी शिखर धवनचा संघात प्रवेश करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाकडून मिळालेल्या 208 धावांचा पाठलाग करणाऱ्या हिंदुस्थान ‘अ’ संघाने 6 गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. कर्णधार मनीष पांडेने 5 षटकार व 3 चौकारांसह 81 धावांची देदीप्यमान खेळी साकारली. इशान किशनने 40 धावांची आणि शिवम दुबेने नाबाद 45 धावांची खेळी केली. दरम्यान, याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने 207 धावा केल्या. हेन्रीच क्लासेनने सर्वाधिक 44 धावा केल्या.

























































