पाकिस्तान हा एकमेव देश आहे जो दहशतवाद्यांना पेन्शन देतो, हिंदुस्थानने फटकारले

1163

संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी हिंदुस्थानवर केलेल्या आरोपांना हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘पाकिस्तान हा जगभरातील एकमेव असा देश आहे जो इसिस व अलकायदासारख्या दहशतवादी संघटनातील दहशतवाद्याला पेन्शन देतो’, असे सांगत हिंदुस्थानच्या संयुक्त राष्ट्रसंघातील मुख्य सचिव विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे.

इमरान खान यांनी संय़ुक्त राष्ट्रसंघात भाषण करताना हिंदुस्थानवर टीका केली होती. त्यांनी हिंदुस्थान कश्मीरमध्ये मानवअधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पाकिस्तानात एकही दहशतवादी संघटना नाही असा अजब दावा देखील त्यांनी यावेळी केला. त्यांच्या या आरोपांना उत्तर देताना मैत्रा यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. मैत्रा यांनी दहशतवाद, जम्मू कश्मीर, कलम 370, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, आण्विक हल्ल्याची धमकी यावरून पाकिस्तानवर टीकेची झोड उठवली.

‘मानवधिकाराच्या बाता मारणाऱ्या पाकिस्तानने आधी त्यांच्या देशातील अल्पसंख्यांकांची स्थिती बघावी. तेथील अल्पसंख्यांकांची संख्या आता 23 टक्क्यांवरून 3 टक्के झाली आहे. पाकिस्तानने इतिहास विसरता कामा नये. इमरान खान यांना न्यूयॉर्क शहराला सांगायचे नाही का, की ते ओसामा बिन लादेनचे खुले समर्थक आहेत. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवाद्यांच्या यादीतील दहशतवाद्याला पेंशन देत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादी घोषित केलेले 130 जण पाकिस्तानात राहत आहेत. तर 25 बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांचा ठिकाणाही पाकिस्तानात आहे’, अशा शब्दात मैत्रा यांनी पाकिस्तानला फटकारले.

तसेच यावेळी त्यांनी कश्मीर मुद्द्यावर आक्षेप घेण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नसल्याचे देखील सांगितले. ‘जम्मू आणि कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. तेथील लोकांसाठी पाकिस्तानने बोलायची गरज नाही. पाकिस्तान जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद पसरवतोय तर आम्ही जम्मू कश्मीरला मुख्य प्रवाहात आणून तेथे विकास घडवतोय. त्यामुळे पाकिस्तानने या मुद्द्यावर बोलू नये’, असे देखील मैत्रा यांनी इमरान खान यांना सुनावले.

आपली प्रतिक्रिया द्या