बंगळुरुत रोहित-विराटने रचले विक्रमांचे इमले, वाचा सविस्तर…

809

बंगळुरुत झालेल्या निर्णायक लढतीत टीम इंडियाने पाहुण्या ऑस्ट्रेलियावर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आणि मालिका 2-1 अशी खिशात टाकली. या लढतीत सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी धावांची लयलूट केली. या लढतीत टीम इंडियासह विराट व रोहितने अनेक विक्रमांची नोंद केली.

9 हजारी मनसबदार
बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक लढतीत रोहित शर्माने एक दिवसीय क्रिकेटमधील 9 हजार धावांचा टप्पा पार केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथी धाव घेताच रोहितने हा पराक्रम केला. यासह एकाच डावात रोहितने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि ब्रायन लारा यांचा विक्रम मोडला. रोहितने 217 व्या डावात नऊ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. सौरव गांगुली याने 228 डाव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 235 डाव आणि वेस्ट इंडीजचा महान खेळाडू ब्रायन लारा याने 239 डाव घेतले होते.

सर्वात वेगवान 5 हजार धावा
बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली याने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात वेगवान 5 हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर जमा झाला आहे. विराटने 82 व्या डावात या कामगिरीची नोंद केली. विराटने महेंद्रसिंह धोनी रिकी पॉन्टिंगसारख्या खेळाडूंना पछाडत ही कामगिरी नोंदवली.

सर्वाधिक शतकी भागिदारी
कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये 18 व्यांदा शतकी भागिदारी केली. राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या विराट आणि रोहित यांच्यात 137 धावांची भागिदारी झाली. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी भागिदारीचा विक्रम सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या नावावर आहे. या दोघांनी 26 वेळा शतकी भागिदारी केली आहे.

जयसूर्याचा विक्रम मोडला
बंगळुरुत रोहित शर्माने एक दिवसीय कारकीर्दीतील 29 वे शतक ठोकत श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या याचा 28 शतकांचा विक्रम मोडीत काढला. सचिन 49, विराट 43, पॉन्टिंग 30 या खेळाडूनंतर आता रोहित चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

बंगळुरुशी अनोखे नाते
बंगळुरूशी रोहित शर्माचे अनोखे नाते आहे. रोहितने बंगळुरुतील चार लढतींमध्ये 418 धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या एका द्विशतकाचा, एका शतकाचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. रोहितने येथे 44 (2010), 209 (2013), 65 (2017) आणि 119 (2020) धावां चोपल्या आहेत. विशेष म्हणजे रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे दणदणीत धावा केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या