
नवख्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघ क्रिकेटविश्वातील ‘सुपर पावर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला त्याच्याच घरात आव्हान देण्यासाठी सज्ज झालाय. रथी-महारथी खेळाडू सजलेल्या उभय संघांतील फलंदाजांच्या तळपत्या तलवारी आणि गोलंदाजांच्या मुलुख मैदानी तोफा आज एकमेकांना भिडतील, तेव्हा पर्थवर क्रिकेटप्रेमींना अग्निपर्थ बघायला मिळेल, एवढे नक्की.
पक्के व्यावसायिक असलेल्या ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर हरविण्याचे मोठे आव्हान टीम इंडिया पुढे असेल. कारण ऑस्ट्रेलियाच्या शब्दकोशात ‘हार’ हा शब्द जवळपास नाहीच. मात्र, ऑस्ट्रेलिया हरविणे हे हिंदुस्थानसाठी काही नवी गोष्ट नसेल. कारण मागील सामन्यात हिंदुस्थानने कांगारूंना ४ विकेटने हरविले होते; परंतु यावेळी आव्हान वेगळं आहे. नवीन कर्णधार शुभमन गिल पहिल्यांदाच वन डे फॉर्मेटमध्ये हिंदुस्थानी संघाचं नेत्तृत्त्व करतोय. त्याच्यापूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली आणि एम. एस. धोनीसारख्या दिग्गजांनी ही जबाबदारी सांभाळलेली आहे. आता गिलवर त्या परंपरेला पुढे नेण्याचं दडपण असेल.
उभय संघांचे नवे कर्णधार
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स जखमी असून, त्यांच्या अनुपस्थितीत मिचेल मार्श संघाचं नेतृत्व करणार आहे. तो हिंदुस्थानविरुद्ध पहिल्यांदाच कर्णधारपद भूषविणार आहे. म्हणजे दोन्ही संघांचे कर्णधार हे नवे असणार आहे. हिंदुस्थानी संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर पहिल्यांदा वन डे खेळणार आहे. गेल्या ९ मार्चला दुबईत खेळलेल्या फायनलमध्ये हिंदुस्थानने न्यूझीलंडला ४ विकेटने हरविले होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली तब्बल ७ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत.
हेड-टू-हेड
ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानविरुद्ध एकूण १५२ वन डे सामने खेळले आहेत, त्यापैकी ८४ सामने जिंकले, तर टीम इंडियाने ५८ सामन्यांत बाजी मारलेली आहे. १० सामने अनिर्णित राहिलेलेत. याचबरोबर ऑस्ट्रेलियात खेळलेल्या ५४ सामन्यांत हिंदुस्थानने केवळ १४ विजय मिळविले आहेत, तर ३८ वेळा ऑस्ट्रेलियाने बाजी मारलेली आहे.
रोहित-कोहलीवर निवड समितीची नजर
‘रोहित आणि कोहलींच्या कामगिरीचं मूल्यमापन प्रत्येक सामन्यानंतर नव्हे, तर प्रत्येक मालिकेनंतर केलं जाईल, असे संघ निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर यांनी सांगितले. ‘जर त्यांनी ऑस्ट्रेलियात धावा केल्या नाहीत, तर त्यांना संघाबाहेर करण्यात येणार नाही आणि त्यांनी तीन शतके झळकावली, तरी याचा अर्थ असा नाही की त्यांची २०२७ वर्ल्ड कपसाठी निवड पक्की झाली आहे,’ असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
हवामान आणि खेळपट्टी
- पर्थमध्ये दिवसा ६० टक्के, तर रात्री ४० टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामानामुळे सामना प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- वाकाची खेळपट्टी जगातील सर्वांत वेगवान आणि उसळी असलेली खेळपट्टी मानली जाते. त्यामुळे मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवुडसारख्या वेगवान गोलंदाजांना येथे मोठी मदत मिळू शकते.
- पर्थ स्टेडियमवर हिंदुस्थानने अद्यापि एकही वन डे सामना खेळलेला नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियालाही या मैदानावर अद्याप सलामीचा सामना जिंकता आलेला नाहीये. तीन पैकी दोन सामने चेस करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी निवडण्याची शक्यता आहे.
कोहली-रोहित विक्रमांच्या उंबरठ्यावर
विराट कोहलीच्या नावावर सध्या १४,१८१ वन डे धावा आहेत. तो श्रीलंकेच्या कुमार संगकाराला (१४,२३४) मागे टाकून सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात खेळताना ९९० धावा केल्या आहेत. आणखी फक्त १० धावा केल्यानंतर तो ऑस्ट्रेलियात १००० धावांचा टप्पा गाठणारा पहिला हिंदुस्थानी फलंदाज बनणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडने ५८ धावा केल्यास तो वन डे क्रिकेटमध्ये ३००० धावांचा टप्पा पार करेल.
उभय संभाव्य संघ –
हिंदुस्थान – शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज /अर्शदीप सिंह.
ऑस्ट्रेलिया – मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅविस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, जोश फिलिपी (यष्टीरक्षक), मिचेल ओवेन, कूपर कॉनोली, मिचेल स्टार्क, नाथन एलिस, मॅथ्यू कुहेमन, जोश हेजलवुड.