स्मिथला पाचव्या स्टंपवर गोलंदाजी करा! सचिन तेंडुलकरचा हिंदुस्थानी गोलंदाजांना सल्ला

ऑस्ट्रेलिया दौऱयावर विजय मिळवायचा असेल तर स्टीव्हन स्मिथला रोखणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चेंडूला थुंकी लावण्यास मनाई असल्याने स्विंग गोलंदाजांना फारशी मदत होणार नाही. त्यामुळे स्मिथला चौथ्या, पाचव्या स्टंपवर (ऑफ स्टंपच्या बाहेर) गोलंदाजी करा, असा सल्ला विश्वविक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ‘टीम इंडिया’च्या गोलंदाजांना दिला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना ऑफ स्टंपच्या बाहेरच गोलंदाजी करायला सांगितले जाते, मात्र स्टीव्हन स्मिथ पदलालित्याच्या जोरावर ऑफ स्टंपवरील चेंडू टोलविण्यात माहीर आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना चेंडू चौथ्या व पाचव्या स्टंपवर टाकायला हवा. स्मिथला जखडून ठेवण्यात यश मिळविल्यास तो नक्कीच स्लिपमध्ये झेल देईल, असे सचिन म्हणाला.

पार्टटाइम गोलंदाजांकडून अपेक्षा नको

ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टय़ा फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल नसतात. त्यामुळे रविचंद्रन अश्विन व कुलदीप यादव या फिरकीच्या जोडगोळीची खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळे पार्टटाइम गोलंदाजांवर अवलंबून राहणे महागात पडू शकते. 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱयावर हिंदुस्थानने 2-1 फरकाने कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी कुलदीपने सिडनी कसोटीत 5 बळी टिपले होते, तर अश्विनने अॅडलेड कसोटीत 6 फलंदाजांना बाद केले होते. त्यामुळे या जोडीकडून ‘टीम इंडिया’ला पुन्हा एकदा अपेक्षा असेल. फिरकी गोलंदाजांना ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर ताळमेळ बसेपर्यंत दौरा संपलेला असतो. त्यामुळे पार्टटाइम गोलंदाजांनावर अवलंबून राहता येणार नाही. – हरभजन सिंग (फिरकी गोलंदाज)

संतुलित गोलंदाजी ताफा

‘टीम इंडिया’कडे वैविध्यपूर्ण अन् संतुलित असा गोलंदाजी ताफा आहे. कसोटी जिंकण्यासाठी 20 बळी टिपणारे गोलंदाज हवे असतात, मात्र 20 बळी टिपताना धावाही रोखणे तितकेच महत्त्वाचे असते. काही गोलंदाजांनी फलंदाजांना जखडून ठेवायचे आणि काहींनी बळी टिपायची अशी रणनीती यशस्वी होत असते. हिंदुस्थानकडे निश्चितच प्रतिभावान गोलंदाजांना ताफा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही कसोटी मालिका नक्कीच सोपी नसेल.

स्मिथ-वॉर्नरमुळे ऑस्ट्रेलिया मजबूत

स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या अनुभवी खेळाडूंच्या पुनरागमनामुळे निश्चितच ऑस्ट्रेलिया संघाला बळकटी मिळाली आहे. मागच्या वेळी ‘टीम इंडिया’ ऑस्ट्रेलिया दौऱयावर गेली होती, त्यावेळी चेंडू पुरतडण्याच्या प्रकरणामुळे या दोघांवरही बंदी होती. स्मिथने हिंदुस्थानविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दरम्यानची कसोटी मालिका रंगतदार होईल यात शंकाच नाही, असेही सचिन तेंडुलकरने सांगितले.

कोहलीची उणीव जाणवणार

‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. त्यामुळे उर्वरित तीन कसोटी सामन्यांत हिंदुस्थानला कोहलीची उणीव भासेल. मात्र युवा खेळाडूला या संधीचे सोने करून स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल. चेतेश्वर पुजारासारखा तंत्रशुद्ध फलंदाज संघात असणे गरजेचे आहे. शिवाय अजिंक्य रहाणेवरही संघाला जिंकून देण्याची देण्याची जबाबदारी असेल, असेही तेंडुलकर म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या