
सामना ऑनलाईन, बर्मिंगहॅम
‘टीम इंडिया’ला २०१४च्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी क्रिकेट मालिकेत सपाटून मार खावा लागला होता. मात्र दरम्यानच्या काळात विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून नावारूपाला आला. त्याच्याकडे हिंदुस्थानच्या कर्णधारपदाची धुरा सोपविल्यापासून विराटने संघाला अनेक देदीप्यमान विजय मिळवून दिले. या आक्रमक कर्णधाराच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान झाला. मात्र तरीही इंग्लंडविरुद्ध १ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानी संघाच्या क्षमतेची आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे एवढे नक्की.
१००० व्या लढतीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडचा संघ १००० वा कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे बुधवारपासून सुरू होणाऱ्या हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यानच्या कसोटी सामन्याकडे अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष असणार आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ने २००७ मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. मात्र त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ व २०१४मध्ये हिंदुस्थानला अनुक्रमे ०-४ व १-३ फरकाने पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती. इंग्लंड दौऱ्यावर हिंदुस्थानला आतापर्यंत ५७ पैकी केवळ सहा कसोटी सामने जिंकता आलेले आहे, मात्र अलीकडचा काळ इंग्लंडसाठी फारसा चांगला गेलेला नाही. सप्टेंबर २०१७ नंतर इंग्लंडला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्याविरुद्ध केवळ एकच कसोटी जिंकण्यात यश मिळाले. त्यामुळे ‘नंबर वन’ ‘टीम इंडिया’ पाचव्या स्थानी असलेल्या इंग्लंडच्या एक हजाराव्या सामन्याच्या रंगाचा बेरंग करू शकते.
सिद्ध करावे लागेल
विराटच्या नेतृत्काखाली हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका अशा दिग्गज संघाना कसोटी मालिकांमध्ये पराभूत करण्याचा पराक्रम केलाय. मात्र यातील बहुतांश मालिका विजय हे हिंदुस्थानी संघाने मायदेशात मिळवलेले आहेत हे विसरता येणार नाही. त्यामुळे आता विराटकर आपले नेतृत्वगुण सिद्ध करून दाखवण्यासाठी दबाव असेल.
उभय संघ
- हिंदुस्थान – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, करुण नायर, हार्दिक पांडय़ा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
- इंग्लंड -जो रूट (कर्णधार), ऑलिस्टर कुक, किटन जेनिंग्स, जॉनी बेयरस्टॉ, जोस बटलर, बेन स्टोक्स, डेव्हिड मालन, मोईन अली, आदिल रशीद, जॅमी पोर्टर, सॅम कुरेन, जेम्स ऍण्डरसन, स्टुअर्ट ब्रॉड.



























































