ओव्हलवर फलंदाजांचे हाल; फलंदाजांपेक्षा पावसाचीच जोरदार बॅटिंग, हिंदुस्थान 6 बाद 204

 पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ओल्या ओव्हल स्टेडियमवर हिंदुस्थानी फलंदाजांचे हाल झाले. पूर्ण मालिकेत धावांचा पाऊस पाडणारे हिंदुस्थानच्या शतकवीर फलंदाजांपैकी एकही न टिकल्यामुळे हिंदुस्थानची 6 बाद 204अशी स्थिती होती. खेळ थांबला तेव्हा करुण नायर 52 तर वॉशिंग्टन सुंदर 19 धावांवर खेळत होते.

सलग पाचव्या कसोटीतही शुभमन गिल टॉस हरला. गेल्या चार कसोटींत बेन स्टोक्सने टॉस जिंकून चौकार मारला होता तर आज ऑली पोपने तीच मालिका कायम राखली. पोपने टॉस जिंकला आणि नित्यनियमाप्रमाणे हिंदुस्थानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. गेल्या चार कसोटींप्रमाणे आजही हिंदुस्थानच्या यशस्वी जैसवाल आणि के. एल. राहुल या सलामीवीरांना दमदार सलामी देता आली नाही.

जैसवाल अवघ्या 2 धावांवर पायचीत झाला तर राहुलने 14 धावांवर आपला संयम गमावला आणि आपली विकेटही गमावली. त्यामुळे 38 धावांवर हिंदुस्थानची सलामीची जोडी पॅव्हेलियनमध्ये परतली होती. या अपयशी प्रारंभानंतर कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शनने हिंदुस्थानला सावरले.

उपाहाराला हिंदुस्थानने 2 बाद 72 अशी मजल मारली होती. उपाहारानंतर पावसाचा अडथळा सुरू झाला आणि त्याने दुसरे सत्र अक्षरशः भिजवून टाकले. तासाभराचा खेळ वाया घालवल्यानंतर गिल-सुदर्शन पुन्हा मैदानात उतरले, पण तेव्हा गिलने आत्मघाती धाव काढली आणि आपली अमूल्य विकेट इंग्लंडला बहाल केली. त्यानंतर पावसाचा व्यत्यय सुरूच होता.

चहापानानंतर घसरगुंडी

दुसरे सत्र पावसामुळे जवळजवळ वायाच गेले. पाऊस थांबल्यावर साई सुदर्शन आणि करुण नायर मैदानात उतरले, पण हिंदुस्थानी डावाला जॉश टंगने दोन धक्के दिले. आधी सुदर्शन 38 धावांवर बाद झाला तर मँचेस्टरचा हीरो रवींद्र जाडेजा 9 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पंतच्या गैरहजेरीत संधी लाभलेल्या ध्रुव जुरेललाही फार काळ थांबता आले नाही आणि हिंदुस्थानची 6 बाद 153 अशी अवस्था झाली. त्यानंतर संधी मिळालेल्या नायरने अखेर सातव्या डावात धावांची पन्नाशी गाठत संघाला सावरले. नायर आणि सुंदरने अर्धशतकी भागी रचत हिंदुस्थानला दोनशेचा टप्पा गाठून दिला. त्यामुळे हिंदुस्थानी संघाने अखेरच्या तासाभराच्या खेळात इंग्लिश गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.

अयशस्वीजैसवाल

एकीकडे हिंदुस्थानच्या शुभमन गिलसह के. एल. राहुल, रवींद्र जाडेजा, ऋषभ पंत या चौघांनी मालिकेत 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत , मात्र सलामीवीर यशस्वी जैसवाल या मालिकेत आपल्या लौकिकानुसार खेळ करण्यात ‘अयशस्वी’ ठरला आहे. आजही तो 2 धावांवर पायचीत झाला. गेल्या 9 डावांत त्याने 33 धावांच्या सरासरीने केवळ 293 धावा केल्या आहेत. त्याने या मालिकेतील पहिल्याच डावात 101 धावांची खणखणीत खेळी केली, मात्र त्यानंतर त्याने 4, 87, 28, 13, 0, 58, 0 आणि 2 धावा अशा खेळय़ा केल्या आहेत. या पूर्ण मालिकेत तो एकही शतकी सलामी देऊ शकलेला नाही.

गिलचा दुहेरी पराक्रम

शुभमन गिल आपल्या चुकीमुळे धावबाद झाला असला तरी त्याने 21 धावा करत इंग्लंड भूमीवर एका मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा सर गॅरी सोबर्स यांचा 59 वर्षांपूर्वीचा 722 धावांचा विक्रम मोडीत काढला. तसेच सुनील गावसकर यांचा कर्णधार म्हणून एका मालिकेतील सर्वाधिक 732 धावांचा विक्रमही त्याने मागे टाकला. गेल्या चार कसोटी सामन्यांत चार शतके झळकवणाऱया गिलकडून पाचव्या शतकाची अपेक्षा होती, पण तो त्याआधीच धावचीत झाला.त्याने कर्णधाराचा दुहेरी विक्रम आपल्या नावावर केला असला तरी आता हिंदुस्थानसाठी एका मालिकेत केलेल्या गावसकरांच्या 774 धावांच्या विक्रमापासून तो 31 धावा दूर आहे.