हिंदुस्थान विरुद्ध हिंदुस्थानच, युवा वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेचा संघ म्हणजे हिंदुस्थान ब

आजपासून सुरू झालेल्या युवा वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात सामना मैदानावर रंगला खरा, पण खरी फटकेबाजी सोशल मीडियावर पाहायला मिळाली. कारण एकच होते की अमेरिकेच्या अंतिम अकरा संघातील सर्वच खेळाडू हिंदुस्थानी म्हणजेच हिंदुस्थानी वंशाचे असल्याची बाब समोर आली. त्यामुळे नेटिझन्सनी सामन्याला थेट ‘हिंदुस्थान विरुद्ध हिंदुस्थान’ असे नाव दिले.

या सलामीच्या सामन्यात स्पर्धा सुरू असतानाच एका चाहत्याने लिहिले, अमेरिकन संघ कशाला, हिंदुस्थान 2 म्हणा आणि पाहता पाहता अशा कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. ‘ध्वज वेगळा, पण डीएनए एकच’, ‘बॅट फिरतेय कारण रक्तातच क्रिकेट आहे’ अशा भन्नाट प्रतिक्रियांनी सोशल मीडिया गाजला.

अमेरिकेच्या संघात उत्कर्ष श्रीवास्तव, साहिल गर्ग, अर्जुन महेश, अमोघ अरेपल्ली, रित्विक अप्पिडी, ऋषभ शिंपी अशी नावे पाहून अनेकांना स्कोअरकार्ड वाचताना आधारकार्ड आठवल्याशिवाय राहिले नाही. त्यामुळे काही चाहत्यांनी सामन्याला ‘इंडिया विरुद्ध इंडिया’  असेही संबोधले.

खरंतर अमेरिकेत वाढणारी हिंदुस्थानी प्रवासी पिढी आणि क्रिकेटची वाढती लोकप्रियता पाहता हे चित्र नवीन नाही. सीनियर अमेरिकन संघातही अनेक हिंदुस्थानी मुळाचे खेळाडू आधीच चमकत आहेत. एपंदरीत काय, सामना अमेरिका विरुद्ध हिंदुस्थानचा असला तरी चर्चेचा केंद्रबिंदू मात्र हिंदुस्थानच ठरला.

अमेरिकन संघ

उत्कर्ष श्रीवास्तव (कर्णधार), अदनित झाम्ब, नीतीश सुदिनी, अर्जुन महेश, अमरिंदर गिल, सबरीश प्रसाद, आदित काप्पा, साहिल गर्ग, अमोघ रेड्डी अरेपल्ली, रित्विक अप्पिडी, ऋषभ शिम्पी.