Senuran Muthusamy – दक्षिण आफ्रिकेच्या संघातील ‘इंडियन’ खेळाडू, गुवाहाटीत शतकी धमाका करणारा सेनुरन मुथुसामी कोण आहे?

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या गुवाहाटी कसोटीमध्ये पाहुणा संघ वरचढ ठरताना दिसत आहे. पहिल्या दिवसाखेर 6 बाद 247 धावा करणाऱ्या आफ्रिकेने दुसऱ्या दिवशी आपल्या फलंदाजीचा दर्जा दाखवत 400 हून अधिक धावा चोपल्या आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आफ्रिकेने 137 षटकात 7 बाद 428 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी नाईट वॉचमन म्हणून आलेल्या सेनुरम मुथुसामी याने शतकी धमाका केला. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे पहिलेच शतक आहे. त्याच्या शतकी खेळीमुळे आफ्रिकेचा डाव लवकर संपवून कसोटीवर नियंत्रण मिळवण्याचे हिंदुस्थानचे स्वप्न धुळीस मिळाले असून खेळपट्टीचा नूर पाहता कसोटीचा निकाल लागण्याची शक्यताही कमी झाली आहे.

गुवाहाटीमध्ये हिंदुस्थानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा सेनुरन मुथुसामी याचे हिंदुस्थानशी खास कनेक्शन आहे. त्याचे आई-वडील हिंदुस्थानी वंशाचे असून आजही त्याचे नातेवाईक तामिळनाडूतील नागपट्टिनम येथे वास्तव्यास आहेत.

सेनुरन मुथुसामी याचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे झाला. तो अकरा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. अर्थात त्यानंतरही त्याने हार मानली नाही. त्याच्या आईने त्याचे योग्य पालन-पोषण केले आणि त्याला क्रिकेटर बनवले.

पदार्पणात विराटची विकेट

विशेष म्हणजे मुथुसामी याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवातही हिंदुस्थानमध्ये झाली होती. 2019 मध्ये टीम इंडियाविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला होता. विशाखापट्टणमच्या मैदानावर झालेल्या या लढतीत मुथुसामी याने विराट कोहलीची विकेट घेत कसोटी कारकि‍र्दीची सुरुवात केली होती. आता त्याने कारकिर्दीतील पहिले शतकही हिंदुस्थानच्या धरतीवर ठोकले आहे.

घर पे खेल रहे हो क्या? पंचांनी दोनदा वॉर्निंग दिल्यानंतर पंतचा पारा चढला, भर मैदानात कुलदीप यादववर भडकला

पाकिस्तानला रडवले, आता हिंदुस्थानला झुंजवले

केशव महाराज याच्यामुळे मुथुसामी याला आफ्रिकेच्या संघाकडून खेळण्याची संधी कमी मिळाली. मात्र मिळालेल्या संधीचे त्याने नेहमी सोने केले. हिंदुस्थान दौऱ्याआधी पाकिस्तानमध्ये मुथुसामी याने अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवली होती. लाहोर कसोटीत त्याने 11 विकेट्स घेतल्या होत्या आणि रावळपिंडी कसोटीत 89 धावांची खेळी केली होती. यामुळे त्याला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आता हिंदुस्थानविरुद्ध गुवाहाटी कसोटीत त्याला खेळण्याची संधी मिळाली. कॉर्बिन बॉशच्या जागी त्याला संघात स्थान मिळाले आणि त्याने या संधीचेही सोने करत शतक ठोकले.