सपाट खेळपट्टीवर हिंदुस्थानी गोलंदाजांची छाप! दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या दिवशी 6 बाद 247 धावा

कोलकाता आणि पर्थमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गुवाहाटीतील लाल मातीच्या सपाट खेळपट्टीवर हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दुसऱ्या सामन्यात कसोटी दर्जाचे क्रिकेट बघायला मिळाले. पहिल्या तासात खेळपट्टीवर आर्द्रतेमुळे फलंदाजी करताना खबरदारी आवश्यक होती. नंतर खेळपट्टी मोकळी झाली आणि दिवसभराच्या खेळात दक्षिण आफ्रिकेने ८१.५ षटकांत ६ बाद २४७ धावसंख्येपर्यंत मजल मारली. कुलदीप यादवने तीन बळी टिपले. सपाट खेळपट्टी असूनही हिंदुस्थानी गोलंदाजांनी गुणवत्तेची छाप सोडली. मालिकेत आघाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला तीनच्या आसपासच्या रनरेटपर्यंत पोहोचण्यासाठी धोका पत्करावा लागला आणि जेव्हा त्यांनी धोका घेतला, तेव्हा हिंदुस्थानी गोलंदाजांनी त्यांना नेमकेपणाने झटके दिले.

नवीन कर्णधार ऋषभ पंतदेखील आज नाणेफेक हरला. मागील नऊपैकी आठव्यांदा हिंदुस्थानने नाणेफेक गमावली. दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी चांगला खेळ केला; पण कोणीही धावांची ‘पन्नाशी’ पार करू शकला नाही. कोलकात्यातही अशीच परिस्थिती झाली होती. मात्र, तेथे पीच झपाट्याने खराब झाल्याने पाहुण्यांना फटका बसला नाही. गुवाहाटीची खेळपट्टी मात्र फलंदाजांसाठी अधिक खेळकर असतानाही गोलंदाजांसाठी फायदेशीर राहिली. आयडन मार्क्रम (३८) आणि रायन रिकेल्टन (३५) यांनी मालिकेतील सर्वांत मोठी ८२ घावांची सलामीची भागीदारी केली; परंतु चहापूर्वीच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराने मार्क्रमचा त्रिफळा उडविला. गुवाहाटीतील लवकर सूर्योदय-सूर्यास्तामुळे खेळ ९ वाजता सुरू झाला आणि चहाचा ब्रेक ११ वाजता घेतला गेला. चहापानानंतर लगेच कुलदीपने रिकेल्टनला पंतकरवी झेलबाद केले. मग ट्रिस्टन स्टब्स (४९) व कर्णधार टेम्बा बावुमा (४१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी २६.४ षटकांत केवळ ७४ धावा जमविल्या.

उपाहारातून विकेटबाधा

उपाहारानंतर स्टब्स व बावुमा या दोघांनी अधिक आक्रमकता दाखविली; पण रवींद्र जाडेजा व कुलदीप यादव या फिरकीच्या जोडगोळीने तीन जलद बळी घेतले. बबुमा जाडेजावर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका मारताना मिड-ऑफला जैस्वालकरवी झेलबाद झाला. स्टब्स कुलदीपच्या नवीन स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर पहिल्या स्लिपमध्ये राहुलकडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. वियान मुल्डरने सुरुवातीला सिराजच्या काही सैल चेंडूंवर धावा केल्या; पण हिंदुस्थानी परिस्थितीचा अनुभव नसल्याने कुलदीपच्या उंच टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना मिड-ऑफला जैस्वालकडे झेल देऊन बाद झाला.

नवीन चेंडूचा फायदा

शेवटच्या टप्प्यात मोहम्मद सिराजने टॉनी डी झोरझी आणि सेनूरन मुथुसामी यांच्यावर खूप दबाव टाकला; पण जुना चेंडू काही विशेष मदत करत नव्हता. नवीन चेंडू वेळीच घेतलेला हिंदुस्थानचा निर्णय अचूक ठरला. सिराजने नवीन चेंडूवरील पहिल्याच चेंडूवर इनस्विंगरचा भास निर्माण करत चेंडू बाहेर सरकविला आणि झोरझीच्या बॅटची कड घेऊन तो यष्टीमागे पंतच्या हातात विसावला. चार चेंडूंनंतर खराब प्रकाशामुळे दिवसाचा खेळ ८.१ षटके आधीच थांबवावा लागला.