स्वस्त आणि मस्त हेच व्यापाराचे धोरण, योग्य दरात मिळेल, तेथून तेल घेणारच! हिंदुस्थानने स्पष्ट केली भूमिका

आम्ही देशहिताला प्राधान्य देत आहेत. स्वस्त आणि मस्त हेच व्यापार धोरण असते. त्यामुळे हिंदुस्थानला योग्य दरात आणि सर्वोत्तम करार होत असतील तिथूनच आम्ही तेल खरेदी करणार असे रशियातील हिंदुस्थानचे राजदूत विनय कुमार यांनी स्पष्ट केले आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हिंदुस्थानी कंपन्या जिथे सर्वोत्तम करार आणि योग्य दरात मिळेल तिथून तेल खरेदी करत राहतील, असे रशियातील हिंदुस्थानचे राजदूत विनय कुमार यांनी म्हटले आहे. आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करणारे उपाय करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशियाच्या सरकारी TASS वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, कुमार म्हणाले की केंद्र सरकारची प्राथमिकता देशातील 1.4 अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे हे आहे. हिंदुस्थानने सवलतीच्या दरात रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने मोठा टॅरिफ लादल्याच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

व्यापार व्यावसायिक आधारावर होतो यावर भर देत कुमार म्हणाले की, हिंदुस्थानी कंपन्या जिथे सर्वोत्तम करार मिळेल तिथून तेल खरेदी करत राहतील. आमचे उद्दिष्ट देशातील 1.4 अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा आहे. रशियासोबत हिंदुस्थानच्या सहकार्यामुळे जागतिक तेल बाजारपेठेत स्थिरता आणण्यास मदत झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेने आरोप केला आहे की, हिंदुस्थानने रशियन कच्च्या तेलाची खरेदी करत रशियाला युक्रेन युद्धाविरोधात आर्थिक निधी पुरवला आहे. हिंदुस्थानने हा आरोप फेटाळून लावला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाला अयोग्य, अवास्तव आणि अन्याय्य असल्याचे कुमार म्हणाले. हिंदुस्थान- रशियामधील व्यापार परस्पर हितसंबंध आणि बाजार घटकांवर आधारित आहे, असेही कुमार यांनी सांगितले. अमेरिकेसह आणि युरोपमध्ये इतर देश रशियाशी व्यापार करत आहेत,याचीही त्यांनी आठवण करून दिली.