2021चा टी-20 वर्ल्ड कप हिंदुस्थानातच, आयसीसीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

886

हिंदुस्थानात नियोजित कार्यक्रमानुसारच पुढल्या वर्षी (2021) टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. आयसीसीकडून शुक्रवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलियात या वर्षी होणारा टी-20 वर्ल्ड कप काही दिवसांपूर्वीच पुढे ढकलण्यात आला होता. आता हा टी-20 वर्ल्ड कप 2022 सालामध्ये होणार आहे. 2021 सालामध्ये न्यूझीलंड येथे होणारा महिलांचा वन डे वर्ल्ड कप कोरोनामुळे आता 2022 सालामध्ये खेळवण्यात येणार आहे.

आयसीसी, बीसीसीआय व क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टेलीकॉन्फरन्सद्वारा बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात आला. पुरूषांचे दोन टी-20 वर्ल्ड कप व एक महिलांचा वन डे वर्ल्ड कप याबाबत याप्रसंगी निर्णय घेण्यात आले. आयसीसीकडून याआधी महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन कोणत्या देशांमध्ये करण्यात येईल हे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार 2020 सालातील टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात, तर 2021 सालातील टी-20 वर्ल्ड कप हिंदुस्थानात होणार होता. पण कोरोनामुळे आता ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्ड कप 2022 सालामध्ये होणार आहे. तसेच हिंदुस्थानात 2021 सालामध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप कायम ठेवण्यात आला आहे.

इंग्लंडचा हिंदुस्थान दौराही पुढे ढकलला
इंग्लंडचा संघ झटपट मालिका खेळण्यासाठी सप्टेंबर महिन्यात हिंदुस्थानात येणार होता. पण कोरोनामुळे आता ही मालिकाही पुढे ढकलण्यात आली आहे. आता दोन देशांमधील ही मालिका 2021च्या सुरूवातीला होणार आहे. बीसीसीआय व इंग्लंड ऍण्ड वेल्स बोर्डाकडून याबाबत निर्णय घेण्यात आला.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मागणी अमान्य
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 सालातील टी-20 वर्ल्ड कप आयोजनाचा मान आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. पण अशा परिस्थितीत हिंदुस्थानमध्ये 2022मधील टी-20 वर्ल्ड कप व 2023मधील वन डे वर्ल्ड कप असे सलग दोन वर्ल्ड कप आयोजित करण्यात आले असते. पण त्यामुळे 2023 सालातील वन डे वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी बीसीसीआयला वेळ मिळाला नसता. तसेच सलग दोन स्पर्धांचे एकाच देशामध्ये आयोजन केल्यास आर्थिकदृष्टय़ाही मोठा फरक पडू शकतो याकडेही आयसीसीने लक्ष दिले. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मागणी अमान्य करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

न्यूझीलंडमध्येच होणार महिलांचा वर्ल्ड कप
2021 सालामध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा वन डे वर्ल्ड कप आता 2022 सालामध्ये न्यूझीलंडमध्येच होणार आहे. फेब्रुवारी – मार्च या कालावधीत हा वर्ल्ड कप खेळवण्यात येईल. या वर्ल्ड कपसाठी आतापर्यंत पाच संघ पात्र ठरले आहेत. हे संघ 2022 सालामध्ये होणाऱया वर्ल्ड कपसाठीही पात्र असतील. उर्वरीत तीन जागांसाठी 2021 सालामध्ये पात्रता फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या