रशियाकडून तेल खरेदी थांबवल्यास 12 अब्ज डॉलरचे नुकसान

सध्या हिंदुस्थान रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करत आहे. यामुळे अमेरिका नाराज आहे. अमेरिकेने रशियन तेल खरेदीच्या नावावर हिंदुस्थानला लक्ष्य केले आहे आणि एकूण 50 टक्के टॅरिफचा बोजा वाढवला आहे, ज्यामध्ये रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी 25 टक्के दंडाचाही समावेश आहे. या दरम्यान देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, एसबीआयने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार अमेरिकेच्या दबावाखाली हिंदुस्थानने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवले तर हिंदुस्थानला 9 ते 12 अब्ज डॉलरचा जास्तीचा खर्च करावा लागेल.

हिंदुस्थानने 2026 च्या उर्वरित आर्थिक वर्षात रशियाकडून तेल खरेदी केले नाही तर कच्च्या तेलाच्या आयातीचे बिल 9 अब्ज डॉलरपर्यंत वाढू शकते, तर पुढील आर्थिक वर्षात बिल 11.7 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते. गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानने रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी केली आहे आणि हा पुरवठा थांबला तर हिंदुस्थानला इतर देशांकडून जास्त किमतीत तेल खरेदी करावे लागू शकते.

सवलतीच्या दरात तेल पुरवठा

सध्या रशिया जगाला विकतो त्या कच्च्या तेलाच्या 10 टक्के भाग हिंदुस्थान खरेदी करतो. हिंदुस्थानने 2022 पासून रशियाकडून तेल खरेदी वाढवली होती आणि रशियाने सवलतीत तेलाचा पुरवठा वाढवला होता. रशियाने हिंदुस्थानसाठी प्रति बॅरल 60 डॉलरपर्यंत किंमत निश्चित केली आहे. पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आणि युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियन तेल खरेदी बंद केली आहे. म्हणूनच हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करत आहे. रशियाकडून तेल खरेदी करून हिंदुस्थानला खूप फायदा झाला आहे.