ट्रॅफिकची चिंता नाही! हिंदुस्थानच्या पहिल्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीसाठी अमेरिकन कंपनीशी करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानाप्रमाणे आकाशातून टॅक्सीने प्रवास करण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी हिंदुस्थानी एरोस्पेस स्टार्टअप ‘द ईप्लान कंपनी’ने (ePlane Company) अमेरिकन टेक कंपनी एनव्हीडिया कॉर्पोरेशन (Nvidia) सोबत हातमिळवणी केली आहे. या भागीदारीतून हिंदुस्थानची पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी ‘e200x’ तयार केली जाणार आहे. यामुळे रहदारीच्या शहरात नागरिकांना दररोज होणारा ट्रॅफिकाचा त्रास देखील कमी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (eVTOL) तंत्रज्ञानावर आधारित आहे. ‘द ईप्लान आणि Nvidia यांच्यामध्ये झालेल्या या करारामध्ये कोणताही आर्थिक व्यवहार नसून, दोन्ही कंपन्या केवळ प्रगत तंत्रज्ञान आणि तांत्रिक माहिती एकमेकांशी शेअर करणार आहेत. यामुळे हिंदुस्थानातील वाहतुकीचे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या करारांतर्गत ‘Nvidia Omniverse’ लायब्ररीचा वापर करून e200x चे एक ड्युप्लिकेट विमान तयार केले जाणार आहे. या मॉडेलच्या माध्यमातून विमानाचे उड्डाण नियम आणि विविध सेन्सर्सचा ताळमेळ, प्रवास करताना येणाऱ्या अडचणी, सेन्सरमधील बिघाड यासारख्या चाचण्या डिजिटल मॉडेलद्वारे लाखो किलोमीटरचे उड्डाण करून पूर्ण केल्या जातील. यामुळे खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाड अशा कठीण परिस्थितीतही विमानाची कार्यक्षमता तपासणे सोपे होणार आहे.

दरम्यान, ePlane कंपनीचा पहिला नमुना आता तयार झाला असून लवकरच याची ग्राउंड टेस्टिंग सुरू होणार आहे. IIT मद्रासशी संबंधित असलेल्या या स्टार्टअपला नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून (DGCA) डिझाइन मंजूरी आधीच मिळाली आहे. ते केवळ विमान नाही तर संपूर्ण इकोसिस्टम तयार करत आहेत. पुढील काही वर्षांत मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ही एअर टॅक्सी सेवा सुरू करण्याचे कंपनीचे उदिष्ट असल्याचे कंपनीचे संस्थापक सत्य चक्रवर्ती यांनी सांगितले आहे.