हिंदुस्थान चॅम्पियन; 15 वर्षांखालील संघाने जिंकली सॅफ स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या 15 वर्षांखालील फुटबॉल संघाने शनिवारी फुटबॉलच्या रणांगणात उल्लेखनीय कामगिरी करताना सॅफ या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर दिमाखात मोहोर उमटवली. स्ट्रायकर श्रीदर्थ नोंग याने केलेल्या दमदार हॅटट्रिकच्या जोरावर हिंदुस्थानच्या युवा संघाने नेपाळचा 7-0 अशा फरकाने धुव्वा उडवला आणि चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. या स्पर्धेतील पाच लढतींमध्ये हिंदुस्थानने 28 गोल करीत आपले वर्चस्व दाखवून दिले. विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत हिंदुस्थानच्या युवा संघाने प्रतिस्पर्ध्यांना एकही गोल करू दिला नाही.

तिसऱ्या जेतेपदासह सर्वोत्तम

हिंदुस्थानने या जेतेपदासह सॅफ स्पर्धेत सर्वोच्च स्थानावरही झेप घेतली. हिंदुस्थानने 2013, 2017 आणि 2019 सालामध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेचे सर्वाधिक तीन वेळा जेतेपद पटकावणारा हिंदुस्थान हा पहिलाच संघ ठरलाय हे विशेष.