हिंदुस्थानचा अर्जेंटिनावर रोमहर्षक विजय

हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनावर 4-3 गोलफरकाने रोमहर्षक विजय मिळवित दौऱयाची सकारात्मक सुरुवात केली. अर्जेंटिना दौऱयावर हिंदुस्थानला सहा सामने खेळायचे असून त्यात दोन एफआयएच हॉकी प्रो-लीग सामन्यांचाही समावेश आहे.

हिंदुस्थानकडून नीलाकांत शर्मा (16 व्या मिनिटाला), हरमनप्रीत सिंह (28 व्या मिनिटाला), रूपिंदर पाल सिंह (35व्या मिनिटाला) व वरुण कुमार (47 व्या मिनिटाला) यांनी गोल केले. यजमान अर्जेंटिनाकडून ड्रग फ्लिकर लिएंड्रो तोलिनी (33 व्या व 53 व्या मिनिटाला) व मासियो कासेला (41 व्या मिनिटाला) यांनी गोल केले.

उभय संघांनी पहिल्या क्वॉर्टरमध्ये संथ सुरुवात केली होती, मात्र हिंदुस्थानने दुसऱया क्वॉर्टरमध्ये आक्रमक पवित्रा घेतला. शिलानंद लाकडाच्या सुरेख पासवर नीलाकांतने अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाला चकवा देत हिंदुस्थानचे खाते उघडले. अर्जेंटिनानेही प्रतिआक्रमण रचून पेनल्टी कॉर्नर मिळवला, मात्र हिंदुस्थानचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशने यजमानांचे आक्रमण परतावून लावले. त्यानंतर दिलप्रीत सिंहमुळे हिंदुस्थानलाही पेनल्टी कॉर्नर मिळाला. 28 व्या मिनिटाला मिळालेल्या या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने दमदार शॉट लगावत हिंदुस्थानला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱया क्वॉर्टरमध्ये लिएंड्रो तोलिनीने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून अर्जेंटिनाचे खाते उघडले.

आपली प्रतिक्रिया द्या