
सामना ऑनलाईन । गुवाहाटी
रोहित शर्माचे नाबाद दीड शतक (152) आणि कर्णधार विराट कोहलीच्या (140) आक्रमक शतकाच्या जोरावर हिंदुस्थानने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवशीय सामन्यात 8 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. हिंदुस्थानच्या विजयाची पायाभरणी करणारा विराट कोहली सामनावीर ठरला. या विजयासह हिंदुस्थानने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. गुवाहाटीच्या पाटा खेळपट्टीवर उभय संघांनी 645 धावांचा पाऊस पाडला.
वेस्ट इंडीजने दिलेले 322 धावांचे आव्हान हिंदुस्थानने दोन गडय़ांच्या मोबदल्यात 42.1 षटकांत पूर्ण केले. शिखर धवनला (4) ऑशेन थॉमसनने लवकर बाद करत वेस्ट इंडीजला पहिले यश मिळवून दिले. मात्र त्यानंतर विराट कोहलीने रोहित शर्माच्या साथीने वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीचे पिसे काढत 246 धावांची भागीदारी करताना हिंदुस्थानच्या विजयाची पायाभरणी केली. विराटने 107 चेंडूंचा सामना करत 21 सणसणीत चौकार व 2 उत्तुंग षटकार ठोकत आपली शतकी खेळी साजरी केली.
विराट खेळपट्टीवर असताना संयमी फलंदाजी करणाऱया रोहितने गिअर बदलत आक्रमणाची धार कमी होऊ दिली नाही. त्याने नाबाद राहत अंबाती रायडू (नाबाद 22) च्या साथीने हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितने 117 चेंडूंचा सामना करत 15 खणखणीत चौकार आणि 8 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 152 धावा केल्या. तत्पूर्वी, हिंदुस्थानने नाणेफेकीचा कौल जिंकत वेस्ट इंडीजला फलंदाजीस पाचारण केले. अर्धशतकवीर कायरन पॉकेल (51) आणि शतकवीर शिमरॉन हेटमायरने (106) यांच्या खेळीच्या बळावर विडीजला 50 षटकांत 8 बाद 322 असा पल्ला गाठता आला.
summary-india won first match against west indies


























































