आपली वायुसेना : 86 वर्षे अभिमानाची!

513

>> एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले

8 तारखेला सीमोल्लंघन आणि हिंदुस्थानी वायुसेना दिवस एकत्र येण्याचा कांचनयोग यंदा आला आहे. पाहुया आपल्या वायुसेनेची अभिमानास्पद कामगिरी.

युद्ध असो किंवा नैसर्गिक आपत्ती असो अशावेळी युद्धपातळीवर हवाईदल कार्य करत असते. कमीतकमी वेळात तत्काळ पोहोचून मदतकार्य करायचे असेल तर हिंदुस्थानच्या हवाईदलाला तोड नाही हेच खरे. 8 ऑक्टोबर, 1932 मध्ये हिंदुस्थानात हवाईदलाची स्थापना झाली. सध्याच्या काळात हवाईदलाकडे हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणाची यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्र या दलात आहेत. जगातल्या पाच बलाढय़ दलांपैकी हवाईदल महत्वाचे मानले जाते. कारण शत्रूच्या सीमेत खूप आतमध्ये जाऊन हवाईदल हल्ला करु शकते. हवेतल्या हवेत इंधन भरल्यामुळे वैमानिक तेरा- तेरा, चौदा तास लांब पल्ल्यापर्यंत जाऊ शकतो. जॅग्वार विमानाने 1905 मध्ये पहिल्यांदा हवेतल्या हवेत इंधन भरुन ओलांडले. त्याआधी आपण अटलांटीक ओलांडू शकत नव्हतो. तसेच 1984 मध्ये सियाचिनचा कब्जा हिंदुस्थानने घेतला त्यासाठी आर्मीची तुकडी हिंदुस्थानच्या हवाईदलाने हेलिकॉप्टरने उतरवली होती. तेव्हापासून आपण सियाचिनमध्ये हेलिकॉप्टरने मदत करत असतो. त्यामुळे युद्धात, वायुक्षेत्राचे रक्षण करण्यात, नैसर्गिक आपत्तीच्यावेळी मदत करण्यात हवाईदलाचा विशेष सहभाग असतो.

आजचे हवाईदल
लढाई ही कायम जिंकण्यासाठी असते. त्यात कोणी उपविजेता नसतो. त्यामध्ये कोणी नंबर दोन नसतो. ती जिंकायचीच असते. त्यामुळे लढाई जिंकण्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील असतो. त्यासाठी आम्ही नियोजन करत असतो. त्यामुळे आपल्याला पाकिस्तान म्हटलं तर जड जाणार नाही. पण चीनकडे आपण डेटरन्स व्हॅल्यूप्रमाणे बघत असतो, त्यांच्यासोबत युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी जे लागते डेटरन्स ते आपल्याकडे आहे. 1962ची पुनरावृत्ती होणार नाही. याची काळजी आम्ही घेत असतो. याचे कारण आपण आपले सगळे पैसे शस्त्रास्त्र घालवू शकत नाही. आपल्या देशात शिक्षण, आरोग्य अशा अनेक गोष्टींची कमतरता आहे. पण या जोडीला नुसती शस्त्रच नाहीत तर आपली अग्नी 4, अग्नी 5 अशी मिसाईल्सपण आहेत.

जगात पहिल्या पाचमध्ये
आपल्याला लढाईचा खूप अनुभव आहे. त्याच्यामुळे आपण कित्येक वर्षे दुसऱ्या देशांबरोबर सराव करतो. अशामध्ये आपले प्रशिक्षण, आपली सक्षमता त्यातून दिसून येते. आम्हीसुद्धा हिंदुस्थानी प्रशिक्षक म्हणून कित्येक देशांमध्ये जाऊन तिथल्या लोकांना शिकवलेले आहे, मी स्वतः इराकमध्ये दोन वर्षे प्रशिक्षण देत होतो. अशातऱ्हेने जगभर हवाईदलाला मान्यता आहे. प्रत्यक्षात युद्ध आणि सराव या सगळय़ामध्ये हिंदुस्थानच्या हवाईदलाने आपले स्थान निर्माण केलेले आहे. इतका जास्त अनुभव आपल्या हवाईदलाला आहे. आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे की, आपल्याकडे एवढ्या वेगवेगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत. त्यामुळे समुद्रावरून, वाळवंट, जंगल, लेह-लडाख अशा वेगवेगळय़ा टॅरेनमध्ये सगळीकडे भाग घेऊ शकतो. त्यामुळे किती विमाने असावीत हा नंबर महत्वाचा आहे त्यातून आपली क्षमता दिसते. किती विमाने आहेत, त्यातली आधुनिक किती विमाने या देखील गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.

गणवेशाच्या रंगाबाबत…
मी जेव्हा हवाईदलात भरती झालो तेव्हा आमचा गणवेश खाकी होता. खाकीमध्ये मग बदल झाले. गेली कित्येक वर्षे ज्याला निली वर्दीवाले म्हणतात तसा झाला. कारण आकाश निळं असतं. त्याच्यामुळे आकाशी निळ्या रंगाचा शर्ट आणि खाली डार्क निळी पॅण्ट असते. आकाशाला शोभेल असा गणवेश आहे.

महिलांचा सहभाग वाढला
महिलाही आकाशात भरारी घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे हवाईदलात मुलींचे सहभागी होण्याचे प्रमाण वाढले आहे. मला आठवतंय की, 1991-92 पासून या क्षेत्रात मुली आहेत. आपल्या तिन्ही दलांपैकी हवाईदलात महिलांचा सहभाग सर्वात जास्त आहे. जवळपास त्या सगळय़ाच ब्रँचमध्ये आहेत. लॉजिस्टिक, ऍडमिनिस्ट्रेशन, टेक्निशियन या सगळय़ात तर आहेतच, पण काही वैमानिक देखील आहेत. हेलिकॉप्टर चालवणारी गुंजन सक्सेना तिला कारगिलमध्ये कीर्तिचक्र मिळाले आहे. अशातऱ्हेने महिलाही या क्षेत्रात सक्षम आहेत. त्यामुळे आम्हीस त्या सगळ्यांनाच एअर वॉरियर्स म्हणतो. आता त्या फायटर विमाने पण चालवतात.

एअरस्ट्राइकची सक्षमता जगाला दिसली
मंगळुरूमध्ये 2010 मध्ये जो अपघात झाला होता. त्या अपघातात 158 लोक दगावले. त्या अपघातात एक जाणवलं की, रात्री दोन ते चार ही जी वेळ असते ती फार कठीण वेळ असते तेव्हा सगळय़ांना काही ना काही कारणाने झोप येते. अशावेळी मुद्दामहून ज्यावेळी सगळे गाफील असतात त्याचवेळेला आपण बालाकोटवर हल्ला केला. त्यामुळे ऑल व्हेदर, ऑल नाइट एअरफोर्स म्हणतो आणि त्यावेळेला हवामान पण खराब होतं. पण त्यामुळे आपण चटकन कोणतं शस्त्र वापरायचं? आपण जे स्पाईस बॉम्ब वापरले आपल्याकडे अजूनही काही पर्याय होते ते आपण व्यवस्थित नियोजन करून घेतले. मला वाटतं पहिल्यांदा एलओसी ओलांडून आपण त्यांच्या पाकिस्तानात गेलो. आपण ऍक्युरेट बॉम्बिंग केलं. दुसऱया दिवशी हिंदुस्थानी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं विमान जरी पडलं, तरी त्यांनी जे काही केलं ते आपण सगळ्यांनीच पाहिले. त्यांचे जे वागणं होते, प्रत्येक प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर… सगळं अभिमानास्पद होतं. एक वेगळी शान होती. असे लढाईत होते, विमानं पडतात, युद्धकैदी होतात; पण युद्धकैदी झाल्यावर जी देशाची शान त्यांनी राखली ती कौतुकास्पद आणि महत्त्वाची होती. अशातऱहेने वायुयोद्धा ज्याला आपण म्हणतो तसे अभिनंदनने करून दाखवले. मला वाटतं, सगळयांनाच यामुळे हवाईदलाचा आदर आहे.

– हिंदुस्थानी हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.
– सध्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्र, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-4 आय ही संगणक प्रणाली वायुसेनेकडे आहे.
– हिंदुस्थानी वायुसेनेची पहिली महिला मार्शल होण्याचा मान पद्मावती बंडोपाध्याय यांना मिळाला होता.
– हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्र सेनेत सहभागी करण्यात आली आहेत.
– सियाचीनचे ग्लेशियरचे एअरफोर्स स्टेशन हिंदुस्थानी वायुसेनेत सर्वात उंचावर असलेले एअर स्टेशन आहे.
– तसेच अत्याधुनिक लढाऊ विमानांची भर पडल्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च वायुदल आहे.
– हिंदुस्थानी वायुसेना जगातील चौथी सगळय़ात मोठी वायुसेना आहे.
– वायुसेनेचा लोगो आतापर्यंत चार वेळा बदलण्यात आला आहे.
– 1945 ते 1950 या काळात हिंदुस्थानी वायुसेनेला ‘रॉयल इंडियन एअरफोर्स’ या नावाने ओळखले जायचे.
– ‘ऑपरेशन राहत’ हे वायुसेनेमार्फत केलेले जगातील सर्वात मोठे ऑपरेशन.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या