
‘खेलो इंडिया’ मोहिमेतून घडलेल्या कुशल दलाल आणि पर्णीत कौर या हिंदुस्थानी तिरंदाजांनी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत मिश्र कंपाऊंड सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास घडविला. त्यांनी अंतिम फेरीत दक्षिण कोरियाचा 157-154 असा पराभव करत ऐतिहासिक विजय साजरा केला. हिंदुस्थान आणि तिरंदाजीत नेहमीच आघाडीवर असलेल्या दक्षिण कोरियामधील अंतिम लढत अत्यंत थरारक झाली. पहिल्या फेरीनंतर उभय संघ 39-39 अशा बरोबरीत होते. मध्यंतरापर्यंत कोरियाने 78-77 अशी निसटती आघाडी घेतली होती, मात्र तिसऱया फेरीमध्ये कुशल आणि पर्णीत यांनी चार अचूक ‘10’ गुणांसह (यात एक ‘एक्स’ गुण होता – म्हणजे अगदी मध्यभागी असलेला सर्वोत्तम वेध) 117-114 अशी निर्णायक आघाडी घेतली.