India Pakistan War – पाकिस्तानी सैन्याची चौकी, ड्रोन लॉन्चपॅड बेचिराख; हिंदुस्थानचा जोरदार पलटवार

पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानी सैन्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हिंदुस्थानातील 26 ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे हल्ले हिंदुस्थानच्या शुरवीर जवानांनी परतवून लावले आणि पाकिस्तानवर जोरदार पलटवार केला. पाकिस्तान ज्या लॉन्चपॅडवरून हिंदुस्थानवर ड्रोन हल्ला करत होता, तो लॉन्चपॅड आणि पाकिस्तानची चौकी हिंदुस्थानी लष्कराने ड्रोन हल्ला करून बेचिराख करून टाकली आहे. ‘एएनआय’ने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान अधिकच चेकाळला असून हिंदुस्थानवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू-कश्मीर, पंजाब, राजस्थानमधील प्रमुख शहरांवर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली. मात्र बहुतांश ड्रोन आणि क्षेपणास्त्र हिंदुस्थानच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले. अशातच हिंदुस्थानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या जोरदार कारवाईमध्ये जम्मू जवळील पाकिस्तानी चौकी, दहशतवादी लॉन्चपॅड बेचिराख झाली. याच लॉन्चपॅडवरून हिंदुस्थानवर ड्रोन हल्लेही केले जात होते. मात्र आता हा लॉन्चपॅडच उद्ध्वस्त करण्यात हिंदुस्थानी सैन्याला यश आले आहे.