हिंदुस्थानी लष्कराच्या सहा जवानांना ‘शौर्य चक्र’ जाहीर

390

देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत देशाचं रक्षण करणाऱ्या आणि प्रसंगी जिवाची बाजी लढवून शत्रुचा खात्मा करणाऱ्या हिंदुस्थानी सैन्याच्या सहा शूर जवानांचा ‘शौर्य चक्रा’ने सन्मान होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी या सन्मान पदकांची घोषणा करण्यात आली आहे.

या सहा जवानांमध्ये जाट रेजिमेंटचे नायब सुभेदार सोमबीर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. जम्मू आणि कश्मीरमध्ये झालेल्या एका मोहिमेत सोमबीर यांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं होतं. त्यांच्या या अतुलनीय साहसाबद्दल त्यांना शौर्य चक्र या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. सोमबीर यांच्यासह लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर के. बी. सिंग, नायब सुभेदार एन. सिंग, नाईक एस. कुमार आणि शिपाई के. ओराओन या पाच जणांनाही शौर्य चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे. यांपैकी ज्योती लामा यांनी जुलै 2019मध्ये मणिपूर येथे झालेल्या एका मोहिमेत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तसंच 14 दहशतवाद्यांना अटकही केली होती.

हिंदुस्थानी सैन्याचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी, उत्तर कमान कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग आणि अॅडजुटंट जनरल लेफ्टनंट जनरल अरविंद दत्ता यांच्यासह 19 जणांना परम विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या 54 अधिकाऱ्यांनाही विविध पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यातील 10 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर झालं आहे. तर 4 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस दलातर्फे दिलं जाणारं शौर्य पदक जाहीर झालं आहे. पोलीस दलातील सर्वोत्तम सेवेसाठी 40 पोलिसांना सन्मानित करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या