हिंदुस्थानी लष्कराची पीओकेमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर कारवाई, 5 पाकिस्तानी सैनिक ठार

हिंदुस्थानी लष्कराने पीओकेमध्ये कारवाई करत दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी होत असलेल्या गोळीबाराविरोधात हिंदुस्थानच्या लष्कराने तंगधार सेक्टरमध्ये कारवाई केली. लष्कराच्या कारवाईमध्ये अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले असून पाच पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. तसेच अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला असण्याची दाट शक्यता आहे.

पाकड्यांची ‘नापाक’ हरकत, कूपवाडात गोळीबार, दोन जवान शहीद

रविवारी सकाळी कूपवाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानने हिंदुस्थानी लष्कराचे तळ आणि नागरी वस्तीला टार्गेट करून गोळीबार केला. या गोळीबारमध्ये दोन जवान शहीद झाले. एका नागरिकाचाही या गोळीबार मृत्यू झाला, तर घराचे आणि गाड्यांचेही प्रचंड नुकसान झाले. पाकिस्तानच्या या गोळीबाराला हिंदुस्थानने जोरदार प्रत्युत्तर दिले. लष्कराने पाकड्यांचा घुसखोराचा मनसुबा उधळून लावत पीओकेमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी उखळी तोफांचा मारा केला आहे.

लष्कराने कारवाई केलेल्या तळांवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते. तसेच पाकिस्तानच्या गोळीबाराच्या आडून हिंदुस्थानमध्ये घुसखोरी करून जम्मू-कश्मीर आणि संपूर्ण हिंदुस्थानात दहशत माजवण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता. लष्कराने कारवाई करत हा डाव उधळून लावला आहे. कारवाईत चार दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या नाकाखाली दहशतवादी तळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून पाकिस्तानचा ‘नापाक’ चेहरा जगासमोर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या